रेल्वेविरुद्ध महाराष्ट्राला आघाडीचे तीन गुण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 November 2017

पुणे - रेल्वेच्या अखेरच्या पाच फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी रविवारी महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी चोख पार पाडल्यामुळे अनिर्णित लढतीत महाराष्ट्राला पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीचे तीन गुण घेता आले.

पुणे - रेल्वेच्या अखेरच्या पाच फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी रविवारी महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी चोख पार पाडल्यामुळे अनिर्णित लढतीत महाराष्ट्राला पहिल्या डावात मिळविलेल्या आघाडीचे तीन गुण घेता आले.

रेल्वेने तिसऱ्या दिवशी केलेल्या प्रतिकारामुळे ही लढत अनिर्णित राहणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. फक्त पहिल्या डावात कोण आघाडी घेणार, याबाबतचेच औत्सुक्‍य होते. यात महाराष्ट्राने अखेरच्या दिवशी सकाळच्या  सत्रात बाजी मारली. विशेष म्हणजे अपयशी ठरणाऱ्या निकित धुमाळ आणि समद फल्ला यांनी रेल्वेचे अखेरची डबे (तळातील फलंदाज) धडपड करणार नाहीत याची काळजी घेतली आणि हेच अखेरच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. महाराष्ट्राने आज सकाळच्या सत्रात १७ षटकांतच रेल्वेची गाडी ड्रेसिंगरुमध्ये परत आणली. रेल्वेचा पहिला डाव ३८१ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करून ६ बाद १८६ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रेल्वेने दुसऱ्या डावात १ बाद ५४ धावा केल्या, तेव्हा खेळ थांबविण्यात आला. 

रेल्वेच्या अखेरच्या फळीकडून किमान प्रतिकाराची अपेक्षा आज फोल ठरली. अरिंदम घोष आणि मनिष राव या नाबाद जोडीवर त्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र, घोष वैयक्तिक धावसंख्येत एकाच धावेची भर घालून बाद झाला. त्यानंतर फल्लाने मनिष रावचा अडसर दूर केला. दाढेने अनुरित सिंगला बाद केले. अविनाश यादव धावबाद झाला. अमित मिश्राला बाद करून फल्लाने रेल्वेच्या डावाला पूर्णविराम दिला.

पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात वेगवान खेळ केला. या नादात त्यांनी आपल्या विकेटही गमावल्या. मात्र, त्याला धावांची जोड मिळाल्यामुळे आघाडी भक्कम झाली. चिराग खुराणा बाद झाल्यावर महाराष्ट्राने दुसरा डाव घोषित केला. विजयासाठी उर्वरित वेळेत रेल्वेसमोर २८७ धावांचे आव्हान कठिण होते. शिवकांत शुक्‍लाच्या मोबदल्यात त्यांनी दुसऱ्या डावात १८ षटकांत १ बाद ५४ धावा केल्या. या सामन्यातील तीन गुणांनी महाराष्ट्राचे १० गुण झाले असून, ते ‘अ’ गटात रेल्वेच्या (१४) मागे चौथ्या स्थानावर आहेत. 

संक्षिप्त धावफलक - 
महाराष्ट्र ४८१ आणि ६ बाद १८६ (नौशाद शेख ४०, राहुल त्रिपाठी ३०, अंकित बावणे ३०, करण ठाकूर ३-४३) अनिर्णित वि. रेल्वे - ३८१ आणि १ बाद ५४  (वाकसकर नाबाद २३, भिल्ले नाबाद १४)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji cricket competition