बडोद्याविरुद्ध मुंबईवर पराभवाचे संकट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 November 2017

मुंबई - इतिहास घडवायला निघालेल्या मुंबईला आता पराभव टाळण्यासाठी लढा देण्याची वेळ विक्रमी रणजी सामन्यात आली आहे. पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्यानंतर परिस्थिती अवघड करून घेणाऱ्या मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या डावातील चुकांपासून काहीच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल ४०४ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात मुंबईची ४ बाद १०२ अशी अवस्था झाली. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस आहे.

मुंबई - इतिहास घडवायला निघालेल्या मुंबईला आता पराभव टाळण्यासाठी लढा देण्याची वेळ विक्रमी रणजी सामन्यात आली आहे. पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्यानंतर परिस्थिती अवघड करून घेणाऱ्या मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या डावातील चुकांपासून काहीच बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल ४०४ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात मुंबईची ४ बाद १०२ अशी अवस्था झाली. उद्या सामन्याचा अखेरचा दिवस आहे.

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात खेळपट्टीवरील जिवंतपणाचा बडोद्याच्या गोलंदाजांनी फायदा घेत मुंबईच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर बडोद्याच्या फलंदाजांनी खेळपट्टी फलंदाजीस कशी उपयुक्त आहे, हे ५७५ धावा उभारून दाखवून दिले; परंतु मुंबईचा संघ आज तिसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात फलंदाजीस आला आणि धावफलावरील विकेटचा रकाना पुन्हा पटापट बदलू लागला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्‍य रहाणे आणि सूर्यकुमार यादव नाबाद राहिले. या दोन फलंदाजांनंतर आता केवळ सिद्धेश लाड हा एकमेव फलंदाज उरला आहे. त्यानंतर गोलंदाज शिल्लक आहेत. त्यामुळे उद्याची ९० षटके तग धरण्याचे आव्हान कसे पेलले जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

बडोद्याच्या ४०४ धावांच्या आव्हानापेक्षा आजच्या दिवसातील २९ षटके फलंदाजी करण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या मुंबईला पहिला धक्का आपल्या पहिल्याच षटकात मेरिवालाने दिला. कर्णधार तरे बाद झाल्यावर मैदानात आलेल्या रहाणेने पृथ्वी शॉसह अर्धशतकी भागीदारी केली. पृथ्वी सात चौकार आणि एका षटकारासह हल्ला करत असताना बडोद्याचे गोलंदाज संधीची वाट पाहात होते. अशा वेळी स्वप्नील सिंगचा राउंड द विकेट गोलंदाजी करताना फूटमार्कमधून वळलेला चेंडू पृथ्वीला बाद करणारा ठरला. तेथेच बडोद्याला आक्रमणाची दिशा मिळाली. त्यानंतर त्यांचे वेगवान गोलंदाजीही याच पद्धतीने गोलंदाजी करत होते.

त्याअगोदर मुंबईकर गोलंदाजांची परवड कायम राहिली होती. आजच्या पहिल्या सत्रात त्यांनी भले चार विकेट मिळवल्या; पण स्वप्नील सिंगने १६४ धावांची खेळी करून जखमेवर मीठ चोळले. हे कमी काय, तर दहाव्या क्रमांकाचा फलंदाज स्वप्नील मंगलोरकरनेही ४३ धावांची खेळी केली. अखेर बडोद्याने ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित करून मुंबईचा गोलंदाजीतला कमकुवतपणा दाखवून दिला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव - १७१ आणि दुसरा डाव - २९ षटकांत ४ बाद १०२ (पृथ्वी शॉ ५६, अजिंक्‍य रहाणे खेळत आहे २८, अतित सेठ १-४७, मेरिवाला १-१३, स्वप्नील सिंग १-२६). बडोदा, पहिला डाव - १८० षटकांत ९ बाद ५७५ घोषित (आदित्य वाघमोडे १३८, स्वप्नील सिंग १६४, मंगलोरकर ४३, धवल कुलकर्णी २-७९, शार्दुल ठाकूर ३-९५, विजय गोहिल २-१७७)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji karandak cricket competition