esakal | आघाडीसाठी रेल्वेची दमदार धाव
sakal

बोलून बातमी शोधा

गहुंजे (पुणे) - रणजी करंडक लढतीत शनिवारी रेल्वे संघाच्या प्रथम सिंगला बाद केल्यावर आनंद व्यक्त करताना महाराष्ट्राचा गोलंदाज चिराग खुराणा.

आघाडीसाठी रेल्वेची दमदार धाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पहिल्या डावात पावणे चारशेहून अधिक धावा उभारल्यानंतरही महाराष्ट्राला रणजी करंडक लढतीत रेल्वेविरुद्ध वर्चस्व राखण्यात अपयश आले. महाराष्ट्राच्या ४८१ धावांना उत्तर देताना रेल्वेने ५ बाद ३३० अशी दमदार मजल मारली असून, उद्या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. 

मोटवानीने अखेरच्या खेळाडूंबरोबर महाराष्ट्राचा डाव भक्कम केला होता. पण, या भक्कमतेला तिसऱ्या दिवशी शनिवारी गोलंदाजांच्या अपयशाने तडा गेला. महाराष्ट्राच्या गोलंदाजांना पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही सूर गवसला नाही. त्यांनी २५ अवांतर धावा दिल्या. त्यातच क्षेत्ररक्षकांनी साथ न दिल्यामुळे रेल्वेला यजमानांना चोख उत्तर देणे शक्‍य झाले. हेच या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे सार होते. 

रेल्वे संघ तिसऱ्या दिवसअखेरीस अजूनही १५१ धावांनी पिछाडीवर असला, तरी त्यांचे पाच गडी बाद व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे आता सामना अनिर्णित राहणार हे निश्‍चित आहे. पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण कोण मिळवतो हेच आता अखेरच्या दिवसाच्या खेळातील औत्सुक्‍य असेल. 
पी. एस. सिंग नितीन भल्ले, शिवकांत शुक्‍ला यांनी अर्धशतकी खेळी करत संथ का होईना, पण रेल्वेच्या धावांचा वेग राखला. बिनबाद ८८ या दुसऱ्या दिवसअखेरच्या सुरवातीनंतर आज रेल्वेला सुरवातीलाच धक्का बसला.

दुसऱ्याच षटकांत खुराणाने वाकसकरला बाद करून महाराष्ट्राला यश मिळवून दिले. संयमी अर्धशतकी खेळी करणाऱ्या शिवकांत शुक्‍लाचा अडथळाही प्रदीप दाढेने दूर केला. त्याने १२५ चेंडूत ६२ धावा केल्या. मात्र, या आश्‍वासक सुरवातीचा फायदा महाराष्ट्राच्या गोलंदाजांना उठवता आला नाही. रणजी पदार्पण करणाऱ्या प्रथम सिंगने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना निराश केले. अर्थात, यष्टिरक्षक मोटवानीकडून मिळालेल्या जीवदानाचा त्याला फायदा उठवता आला नाही. प्रथम आणि महेश रावत पाठोपाठ बाद झाले. रेल्वे या वेळी ५ बाद २८६ अशा स्थितीत होता. याचाही फायदा महाराष्ट्र उठवू शकले नाही. अरिंदम आणि मनीष रावत यांनी ४४ धावांची नाबाद भागीदारी करून रेल्वेच्या आघाडीच्या आशा कायम ठेवल्या. खेळ थांबला तेव्हा अरिंदम ४४, तर मनीष राव १९ धावांवर खेळत होता. 

संक्षिप्त धावफलक - महाराष्ट्र ४८१, रेल्वे पहिला डाव ११४ षटकांत ५ बाद ३३० (शिवकांत शुक्‍ला ६२, प्रथम सिंग ७३, नितीन भल्ले ५६, अरिंदम घोष खेळत आहे ४४, मनीष राव खेळत आहे १९, चिराग खुराणा २-५०)

loading image