मुंबई संघ पराभवाच्या गडद छायेत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 December 2017

नागपूर - नाणेफेकीपासून सर्व फासे उलटे पडू लागलेल्या मुंबईचा रणजी उपांत्यपूर्व सामन्यातला पराभव जवळपास निश्‍चित होत चालला आहे. ३९७ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात तीन बाद १२० अशी अवस्था झाली आहे. कर्नाटकविरुद्धच्या या सामन्याचे दोन दिवस शिल्लक असताना उद्याच खेळ खल्लास होण्याची शक्‍यता अधिक आहे.

नागपूर - नाणेफेकीपासून सर्व फासे उलटे पडू लागलेल्या मुंबईचा रणजी उपांत्यपूर्व सामन्यातला पराभव जवळपास निश्‍चित होत चालला आहे. ३९७ धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावात तीन बाद १२० अशी अवस्था झाली आहे. कर्नाटकविरुद्धच्या या सामन्याचे दोन दिवस शिल्लक असताना उद्याच खेळ खल्लास होण्याची शक्‍यता अधिक आहे.

जामठा स्टेडियमच्या ज्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी कर्नाटकच्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला त्याच खेळपट्टीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुंबईकर गोलंदाजांची मात्र दैना झाली. कधी एकदा कर्नाटकचा डाव संपुष्टात येतो याची केविलवाणी वाट पाहावी लागली. अखेर १६३.३ षटके गोलंदाजी केल्यानंतर ५७० धावा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

जवळपास चारशे धावांच्या पिछाडीचे ओझे घेऊन मैदानात उतरणाऱ्या मुंबई फलंदाजांच्या संयमाची परीक्षा होणार आहे, पण तिसऱ्या दिवसापर्यंत पहिले तीन फलंदाज त्यांनी गमावले. पहिल्या दिवशी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी साह्य करणारी होती, तरी मुंबई फलंदाज बाद होण्यामागे बेजबाबदारपणा अधिक होता. आज दुसऱ्या डावातही त्याचीच पुनरावृत्ती होती. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेला पृथ्वी शॉ आणि जय बिश्‍त यांना यष्टींवरच्या चेंडूंचा अंदाजच आला नाही. ‘आ बैल मुझे मार’ अशी त्यांनी अवस्था करून घेतली, तर अखिल हेरवाडकरने क्षेत्ररक्षक असलेल्या ठिकाणीच हवेत चेंडू मारला. सूर्यकुमार यादव नाबाद अर्धशतक करून मैदानावर आहे. त्याच्यासह सिद्धेश लाड, आदित्य तरे हे फलंदाज उद्या किती किल्ला लढवतात यावर मुंबईचा पराभव किती लांबतो एवढीच उत्सुकता असेल.

तत्पूर्वी आजही कर्नाटकच्या फलंदाजांनी मुंबईकर गोलंदाजांचा दुबळेपणा सिद्ध केला. त्यांचा अखेरचा फलंदाज अरविंद श्रीनाथनेही तडाखेबंद अर्धशतकी खेळी करून वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. अष्टपैलू श्रेयस गोपाळ तर बादच झाला नाही, त्याने बरोबर दीडशतकी खेळी केली. विनय कुमार आणि गौथम के. यांनीही तिशीच्या पलीकडे मजल मारली. मुंबईच्या क्षेत्ररक्षणातही सुधारणा झाली नाही. शतकानंतर श्रेयसचा सोपा झेलही पकडता आला नव्हता. 

संक्षिप्त धावफलक - मुंबई, पहिला डाव - १७३ आणि दुसरा डाव ः ३ बाद १२० (पृथ्वी शॉ १२, जय बिश्‍त २०, हेरवाडकर २६, सूर्यकुमार यादव खेळत आहे ५५, गौतम १६-६-३०-२). कर्नाटक, पहिला डाव - ५७० (मयांक अगरवाल ७८, कौनिन अब्बास ५०, गौतम ७९, श्रेयस गोपाल नाबाद १५० -२७४ चेंडू, ११ चौकार, विनय कुमार ३७, गौथम के. ३८, अरविंद श्रीनाथ ५१, धवल कुलकर्णी ३८-८-१०५-२, शिवन मल्होत्रा २६.३-१-९७-३, शिवम दुबे ३७-५-९८-५).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranaji karandak cricket competition