त्रिपाठीच्या शतकानंतरही कर्नाटकची पकड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 November 2017

गहुंजे - कर्नाटकविरुद्ध प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राच्या फलंदाजांना संयमाअभावी फटका बसला. नाणेफेकीत अनुकूल कौल लागल्यानंतर कर्णधार विनयकुमारने सहा विकेट टिपल्या. त्यामुळे शतकवीर राहुल त्रिपाठी व नौशाद शेख यांच्या प्रतिआक्रमणानंतरही कर्नाटकला पहिल्याच दिवशी पकड घेता आली.

गहुंजे - कर्नाटकविरुद्ध प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राच्या फलंदाजांना संयमाअभावी फटका बसला. नाणेफेकीत अनुकूल कौल लागल्यानंतर कर्णधार विनयकुमारने सहा विकेट टिपल्या. त्यामुळे शतकवीर राहुल त्रिपाठी व नौशाद शेख यांच्या प्रतिआक्रमणानंतरही कर्नाटकला पहिल्याच दिवशी पकड घेता आली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कर्नाटकने महाराष्ट्राला २४५ धावांत रोखले. त्यानंतर त्यांनी बिनबाद ११७ अशी भक्कम सुरवात केली. कर्नाटक आणखी १२८ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या सर्व विकेट बाकी आहेत. त्यांचे दोन्ही सलामीवीर स्थिरावले असून, मयांक वेगवान फलंदाजी करीत आहे. त्यातच प्रदीप दाढेने तीन वाईडसह ११ धावांची खैरात केली.

घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्याच सामन्यात यजमान फलंदाजांकडून सरस खेळ अपेक्षित होता. खेळपट्टी मुळातच वेगवान गोलंदाजीला साथ देणारी होती. त्यातच थंडीमुळे आणखी प्रतिकूल परिस्थिती होती. अशावेळी किमान पहिला तास किल्ला लढविण्याची गरज होती, पण महाराष्ट्राने निम्मा संघ २८ धावांत गमावला.

विनयचा चेंडू गुगळेच्या बॅटची कड घेऊन स्टम्पवर आदळला. मिथूनच्या चेंडूवर ऋतुराजचा झेल शॉर्टलेगला गेला. खडीवाले विनयच्या चेंडूवर चकून यष्टीमागे झेल देऊन परतला. विनयच्या चेंडूवर बावणेचा झेल गलीत गेला. मोटवानीचा स्वीप फॉरवर्ड शॉर्टलेगला निश्‍चलने अफलातून टिपला. त्या वेळी १३व्या षटकात ५ बाद २८ अशी घसरगुंडी उडाली होती.

त्यानंतर नौशाद-त्रिपाठीने १४७ धावांची भागीदारी रचली. तेव्हा खेळपट्टी अनुकूल, तर कर्नाटकचे गोलंदाज हताश वाटत होते. ऑफस्पिनर देशपांडेने ही जोडी फोडली. नौशादचा जम बसला होता. त्याचा पूलचा एक प्रयत्न फसला होता. एक चेंडू संयम राखल्यानंतर तो असाच फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. चिरागला जीवदानाचा फायदा उठविता आला नाही. त्यामुळे त्रिपाठीसमोर फटकेबाजीशिवाय पर्याय उरला नाही. 

संक्षिप्त धावफलक : 
महाराष्ट्र ः ५५ षटकांत सर्वबाद २४५ (नौशाद शेख ६९-१०५ चेंडू, १० चौकार, राहुल त्रिपाठी १२०-११४ चेंडू, १३ चौकार, ३ षटकार, आर. विनयकुमार १४-१-५९-६, मिथुन १-३४, स्टुअर्ट बिन्नी १-४३, पवन देशपांडे २-३८) वि. कर्नाटक ः ३१ षटकांत बिनबाद ११७ (आर. समर्थ खेळत आहे ४७, मयांक अगरवाल खेळत आहे ५०- ९४ चेंडू, ६ चौकार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ranji trophy