चिराग खुराणाच्या फिरकीने महाराष्ट्राचे वर्चस्व

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

लखनौ - महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी चिराग खुराणाच्या फिरकी गोलंदाजीमुळे उत्तर प्रदेशविरुद्ध वर्चस्व राखण्याची संधी साधली. महाराष्ट्राचा पहिला डाव ३१२ धावांत आटोपल्यावर उत्तर प्रदेशची दुसऱ्या दिवसअखेरीस ७ बाद २३२ अशी अवस्था झाली होती. उत्तर प्रदेश अजून पहिल्या डावात ८० धावांनी पिछाडीवर आहे.

लखनौ - महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी चिराग खुराणाच्या फिरकी गोलंदाजीमुळे उत्तर प्रदेशविरुद्ध वर्चस्व राखण्याची संधी साधली. महाराष्ट्राचा पहिला डाव ३१२ धावांत आटोपल्यावर उत्तर प्रदेशची दुसऱ्या दिवसअखेरीस ७ बाद २३२ अशी अवस्था झाली होती. उत्तर प्रदेश अजून पहिल्या डावात ८० धावांनी पिछाडीवर आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचा डाव अधिक लांबणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र, याचा फायदा त्यांच्या फलंदाजांना उठवता आला नाही. विशेषतः कर्णधार सुरेश रैनाचा भोपळा नक्कीच त्यांना चिंतेत टाकणारा ठरला. अल्मास शौकत (६३) आणि शिवम चौधरी (५४) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेली १०१ धावांची भागीदारी त्यांना सुखावणारी होती. अर्थात ही भागीदारी वगळता त्यांच्या डावात काहीच घडले नाही.

महाराष्ट्राला अक्षय दरेकरने पहिले यश मिळवून दिल्यावर शौकत आणि चौधरी यांनी उत्तर प्रदेशचा डाव लावून धरला होता. ही जोडी जमलेली असतानाच चिराग खुराणाने दोन चेंडूंच्या अंतराने शौकत आणि कर्णधार रैना (०) यांना बाद केले. आपल्या पुढच्याच षटकात त्याने चौधरीचाही अडथळा दूर केला. या धक्‍क्‍यातून उत्तर प्रदेश सावरू शकले नाही. एकलव्य द्विवेदी याने नाबाद ४० धावा करताना तग धरला असला, तरी आता त्यांच्याकडे आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने केवळ तीनच फलंदाज बाकी आहेत हे विसरून चालणार नाही.

त्यापूर्वी, महाराष्ट्राचा डाव आज फार लांबू शकला नाही. नाबाद शतकवीर वैयक्तिक धावसंख्येत १२ धावांचीच भर घालू शकला, तर दुसरा नाबाद  फलंदाज मोटवानी दिवसातील दुसऱ्याच षटकांत एकाही धावेची भर न घालता बाद झाला. त्यानंतर महाराष्ट्राचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत ३८ धावांची भर घालून महाराष्ट्राचा पहिला डाव ३१२ धावांत आटोपला.  सौरभ कुमारने ११० धावांत ७ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव ३१२ (अंकित बावणे ११९, ऋतुराज गायकवाड ६३, रोहित मोटवानी ६२, सौरभ कुमार ७-११०) वि. उत्तर प्रदेश पहिला डाव ७ बाद २३२ (अल्मास शौकत ६३, शिवम चौधरी ५४, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ४०, चिराग खुराणा ४-३८)