विराट कोहलीच्या संघात ‘दि बेस्ट’ची क्षमता - शास्त्री

पीटीआय
गुरुवार, 13 जुलै 2017

गांगुली आणि शास्त्री
शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी गतवर्षी कुंबळेची निवड करताना सल्लागार समितीचे सदस्य सौरभ गांगुलीबरोबर शास्त्री यांची शाब्दिक लढाई झाली होती. आता गांगुलीबाबत विचारले असता शास्त्री म्हणतात, ‘‘आम्ही माजी कर्णधार आहोत, मतभेद असू शकतात, पण दोघांमध्ये एकमेकांबाबत आदर आहे.’’

नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा विद्यमान संघ कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या आतापर्यंतच्या सर्व संघांच्या तुलनेत सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असे भाकीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी दुसऱ्यांदा नियुक्त झालेल्या रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 

२०१४ ते २०१६ या काळात शास्त्री अगोदर संघ संचालक आणि त्यानंतर प्रशिक्षक राहिलेले आहेत. आता २०१९ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शास्त्री हे सध्या लंडनला असून तेथून मुलाखत देताना त्यांनी विराट कोहलीचा हा संघ परदेशांतही यशस्वी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

आतापर्यंतचा हा सर्वोत्तम संघ आहे. या संघाबरोबर काम करणे हे भाग्य आहे. या संघात असलेला वेगवान मारा कोणत्याही वातावरणात यशस्वी ठरू शकतो. सर्व खेळाडू तरुण आहेत. योग्य वयात त्यांना ही संधी मिळत आहे, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. कोहली-कुंबळे वादानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणे किती कठीण असेल, या प्रश्‍नावर शास्त्री यांनी मी आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे उत्तर दिले. मी नेहमीच आव्हानाचा सामना करण्यास सज्ज असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ravi shastri cricket