esakal | गोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी - शास्त्री
sakal

बोलून बातमी शोधा

गोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी - शास्त्री

गोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी - शास्त्री

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी निवड झालेल्या भारतीय संघातील गोलंदाजांना प्रोत्साहन देताना भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेली आपली गोलंदाजांची फळी भक्कम आहे; पण दक्षिण आफ्रिकेत फलंदाजांवर मोठी जबाबदारी राहील.’ असे मत व्यक्त केले. 

एका वृत्त वाहिनीशी बोलताना दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी आपली मते मोकळेपणाने मांडली. भारतीय संघाने यंदाच्या मोसमात मायदेशात चांगले यश मिळविले आहे. आता आगामी १८ महिने खऱ्या अर्थाने या संघाची कसोटी लागेल असे सांगून ते म्हणाले, 

‘‘मायदेशातील यशानंतर भारतीय संघ आता परदेशातील परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. खरंच, आगामी १८ महिन्यांत या संघाचा खरा कस लागेल. आधी दक्षिण आफ्रिका, पुढे इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया असे खडतर दौरे भारतीय संघाला करायचे आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कधी जिंकलेला नाही. या संघाला हा इतिहास बदलण्याची चांगली संधी आहे.’’

फलंदाजी निर्णायक
शास्त्री यांनी या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फलंदाजी निर्णायक ठरेल, असे आवर्जुन सांगितले. ही मालिकाच प्रतिस्पर्धी गोलंदाजांपेक्षा भारतीय फलंदाजी वि. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी अशी अधिक रंगेल. त्यांची गोलंदाजी आव्हानात्मक आहे; पण आपले गोलंदाजही काही कमी नाहीत. गोलंदाजांनी मिळविलेल्या यशाला फलंदाजीच्या आघाडीवर साथ मिळायला हवी.’’ शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय असे तीन सलामीचे पर्याय भारताकडे आहेत. यात शास्त्री यांनी सलामीसाठी धवन-विजय यांना पसंती दिली आहे. धवन फॉर्मात आहे, तर मुरलीची परदेशातील कामगिरी चांगली आहे. राहुलला योग्यवेळी त्याची संधी मिळेल. तो गेल्या दीड वर्षांत चांगला प्रगल्भ झाला आहे. कोहली, रहाणे, पुजारा ही मधली फळी नक्कीच अनुभवी आहे. त्यामुळे हीच भारतीय संघाची ताकद असेल.

दक्षिण आफ्रिकेतील वातावरण
दक्षिण आफ्रिकेतील वातावरण वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असेल हे वेगळे सांगायला नको. दोन फिरकी गोलंदाजांना संधी मिळणे नक्कीच कठिण आहे. अर्थात, तिकडे गेल्यावर खेळपट्टीचे स्वरूप पाहून त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल. दोघांपैकी एका फिरकी गोलंदाजाची निवड करताना त्याचे अधिकार कोहलीचे असतील.

मैदानावर आणि मैदानाबाहेर आता विराट कोहली खूप प्रगल्भ झाला आहे. फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्यात झालेली प्रगती लक्षणीय आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे. सहाजिकच कोहलीच भारतीय संघाचा ‘बॉस’ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मी फक्त त्याला सहायक म्हणून काम करतोय.
- रवी शास्त्री,  भारतीय संघाचे प्रशिक्षक

loading image