कुंबळे-शास्त्री येतील आणि जातील...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

संघाचा पाया भक्कम राहील - रवी शास्त्री 

मुंबई - कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे ते केवळ त्यांच्या अथक मेहनतीमुळे, कुंबळे- शास्त्री येतील आणि जातील; पण भारतीय क्रिकेटचा पाया आणि त्यावर उभारलेली इमारत भक्कम राहील, असे स्फूर्तिदायी वक्तव्य टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी काही तास अगोदर झालेल्या पत्रकार परिषेदतून कोहली- शास्त्री जोडी पुन्हा एकत्र आली.

संघाचा पाया भक्कम राहील - रवी शास्त्री 

मुंबई - कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे ते केवळ त्यांच्या अथक मेहनतीमुळे, कुंबळे- शास्त्री येतील आणि जातील; पण भारतीय क्रिकेटचा पाया आणि त्यावर उभारलेली इमारत भक्कम राहील, असे स्फूर्तिदायी वक्तव्य टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी काही तास अगोदर झालेल्या पत्रकार परिषेदतून कोहली- शास्त्री जोडी पुन्हा एकत्र आली.

प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यावरून मैदानाबाहेर महिनाभर सुरू असलेल्या वादानंतर आता प्रत्यक्ष मैदानावर मर्दुमकी गाजवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला. कर्णधाराला हवा तो प्रशिक्षक मिळाला आणि प्रशिक्षकाला हवा तो सपोर्ट स्टाफ मिळाला, अशा पूरक वातावरणात कोहली- शास्त्री जोडी जमली.

दोन आठवड्यांत अधिक परिपक्व
जेथून मी संघापासून दूर गेलो होतो, तेथूनच मी पुनरागमन करत आहे. या अगोदर मी श्रीलंका दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हापासून अधिक सक्षम झालो आहे; पण गेल्या दोन आठवड्यांतील घडामोडींतून अधिक परिपक्व झालो आहे, असे शास्त्री यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. म्हणूनच कुंबळे- शास्त्री आले गेले तरी भारतीय संघाचे यश हे त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे, याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच आहे.

 ...म्हणून अरुणला पसंती 
गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून अरुणलाच पसंती का दिली या प्रश्‍नावर शास्त्री आक्रमपणे म्हणाले... त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही पाहा! १५ वर्षे तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त अनुभव आहे. ज्युनियर संघ, तसेच  ज्युनियर विश्‍वकरंडक संघांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव त्याच्या गाठिशी आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत ८० पैकी ७७  विकेट वेगवान गोलंदाजांनी मिळवले, हे त्याचेच यश आहे. 

खेळाडू आणि प्रशिक्षकांचे नाते
खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या नात्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर शास्त्री यांनी, खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकेतून पुढाकार घेत उत्तर दिले. खेळाडू म्हणून मानसिकता भक्कम असणे आवश्‍यक असते आणि हीच मानसिकता कशी भक्कम राहील हे प्रशिक्षक म्हणून पाहणे, हे माझे काम आहे, असे ते म्हणाले.

दहा मिनिटांची ‘ट्‌वेन्टी-२०’
वर्षभरानंतर कोहली- शास्त्री यांची आज पुन्हा एकत्रितपणे पत्रकार परिषद झाली. याकडे भारतीय क्रिकेटचे लक्ष लागून राहिले होते. अडचणीचे प्रश्‍न उपस्थित केले जाणार हे अपेक्षित होते. पण, ही पत्रकार परिषद ट्‌वेन्टी-२० सामन्यासारखी झाली. अवघ्या दहा मिनिटांत केवळ सात प्रश्‍नांमध्ये हा ‘सामना’ संपला. एरवी सडेतोड बोलणारा कोहली आज शांत होता; पण शास्त्री यांनी आपली हुकुमत दाखवली.

कोहली म्हणतो...

गतवेळचा श्रीलंका दौरा लॅंडमार्क होता, त्या दौऱ्यातूनच परिपक्वता. 
परदेशात विजयाची सुरवात झाली होती. 
श्रीलंकेत पहिली कसोटी गमावल्यानंतर मालिका जिंकण्याची कामगिरी आत्मविश्‍वास फुलवणारी ठरली.
माझ्या हातात बॅट आहे आणि मला धावा करायच्या आहेत. 
कर्णधार म्हणून संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायची आहे.
एकमेकांना समजून घेणे आणि संवाद महत्त्वाचा.
जे काम मला करायचे आहे त्यावर मी ठाम आहे. अजूबाजूला काय चर्चा सुरू आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ravi shastri talking, foundation of the team will be strong