शास्त्रींचा झहीरवर भरवसा नाय काय?

पीटीआय
शुक्रवार, 14 जुलै 2017

नवी दिल्ली- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्री हे आपल्या मर्जीतील भारत अरुण यांना पुन्हा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून संघात आणण्यासाठी उत्सुक आहेत. सल्लागार समितीने झहीर खान यांची यापदी नियुक्ती करूनही शास्त्री यांनी अजून अधिकृतपणे सूत्रे घेतलेली नसतानाही सुरू केलेले हे प्रयत्न भुवया उंचावणारे आहेत.

नवी दिल्ली- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्री हे आपल्या मर्जीतील भारत अरुण यांना पुन्हा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून संघात आणण्यासाठी उत्सुक आहेत. सल्लागार समितीने झहीर खान यांची यापदी नियुक्ती करूनही शास्त्री यांनी अजून अधिकृतपणे सूत्रे घेतलेली नसतानाही सुरू केलेले हे प्रयत्न भुवया उंचावणारे आहेत.

सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवडताना भारत अरुण यांना वगळून झहीरची गोलंदाजीचा प्रशिक्षक आणि राहुल द्रविडची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजीचा सल्लागार म्हणून निवड केली; परंतु झहीरची निवड शास्त्री यांना खटकणारी ठरू शकेल, अशी चर्चा निवडीच्या दिवसापासून सुरू झाली होती.

‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीचा अनुभव लक्षात घेता सल्लागार समितीमधील सौरभ गांगुली या वेळीदेखील शास्त्रींच्या विरोधात होते. मात्र, सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ते शास्त्री यांच्या नियुक्तीसाठी राजी झाले. मात्र, त्याच वेळी त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी झहीर आणि परदेश दौऱ्यात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून द्रविड यांची निवड केली. 

सल्लागार समितीसमोर मुलाखतीदरम्यान शास्त्री यांनी जेसन गिलेस्पी यांचाही पर्याय ठेवला होता. पण, ‘बीसीसीआय’ त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी वेंकटेश प्रसाद यांचे नाव पुढे केले. या वेळी शास्त्री यांनी विरोध करून अरुण यांच्याच निवडीवर भर दिल्याचे समजते. 

शास्त्रींची लगबग
रवी शास्त्री सध्या लंडनमध्ये असून, ते आपला लंडन दौरा आटोपता घेत आठवड्याच्या अखेरीस भारतात परतणार आहेत. मायदेशी परतल्यावर ते ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासक समितीची भेट घेणार आहेत. शास्त्रींचा झहीरला विरोध नाही; पण ते अरुणलाही सामावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांची लगबग असून, ते आता पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक हवा, असे टुमणे काढत आहेत. त्यानुसार झहीर गोलंदाजांसाठी दिशादर्शक कार्यक्रम आखतील आणि त्याची अंमलबजावणी अरुण करतील, अशी कल्पना शास्त्री प्रशासक समितीसमोर शनिवारी मांडण्याची शक्‍यता आहे. 

‘बीसीसीआय’चा पुन्हा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेले नाट्य अजून संपता संपत नाही. शास्त्रींच्या नावाची घोषणा करताना झहीर खानची पूर्ण वेळ गोलंदाजी प्रशिक्षक निवड केल्याचे सांगितले. मात्र, आता शास्त्रींनी भारत अरुण यांचा आग्रह धरल्यावर ‘बीसीसीआय’ने झहीरची निवड ही द्रविडप्रमाणे संघाच्या दौऱ्यानुसार सल्लागार म्हणून करण्यात आली असल्याचा खुलासा ‘बीसीसीआय’ने केला. इतकेच नव्हे तर दोघांची निवड ही शास्त्री यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतरच करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ravi shastri zaheer khan