esakal | ताकदीपेक्षा ‘टायमिंग’ला महत्त्व - रोहित
sakal

बोलून बातमी शोधा

ताकदीपेक्षा ‘टायमिंग’ला महत्त्व - रोहित

ताकदीपेक्षा ‘टायमिंग’ला महत्त्व - रोहित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुधवारी रोहित शर्माने तिसरी द्विशतकी खेळी केली. महेंद्रसिंह धोनीने मला सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून रोहितची बॅट तळपायला लागली.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपली क्षमता कधीच सिद्ध केली आहे. तिसरी द्विशतकी खेळी करून त्याने आपल्याला पर्याय नसल्याचेच सिद्ध केले. सामन्यानंतर एका खास वेळेत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच त्याची मुलाखत घेतली. तेव्हा रोहित म्हणाला,‘‘माझ्याकडे धोनी, एबी डिव्हिलीयर्स, गेलसारखी ताकद नाही, पण माझा ‘टायमिंग’वर अधिक विश्‍वास आहे. त्याचबरोबर चेंडूच्या रेषेत येऊन क्षेत्ररक्षणानुसार खेळणे मला अधिक आवडते.’’

शास्त्री यांनी रोहितला तीन द्विशतकांपैकी तुला कोणती अधिक भावते, असे विचारले असता रोहितने अर्थातच तीनही असेच उत्तर दिले. तो म्हणाला,‘‘मला तीनही द्विशतकी खेळी आवडतात. कारण, या तीनही द्विशतकी खेळी भारतीय संघाच्या अडचणीच्या काळात झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये पहिले द्विशतक झळकावले तेव्हा तो सामना मालिकेचा विजेता ठरवणारा होता. श्रीलंकेविरुद्ध २०१४ मध्ये दुसरे द्विशतक झाले तेव्हा त्या सामन्यापूर्वी मी तीन महिने दुखापतींचा सामना करत होता. धावा करू शकेन की नाही, याचाही मला विश्‍वास नव्हता. या वेळी तिसरे द्विशतक झाले तेव्हा पहिल्या सामन्यातील स्वतःबरोबर संघाचे अपयश मला सलत होते. शेवटपर्यंत मैदानावर राहायचे, याच उद्देशाने मैदानात उतरलो आणि खेळलो.’’

रोहितने या वेळी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील हे वर्ष सर्वांत महत्त्वाचे असल्याचेही सांगितले. तो म्हणाला,‘‘हे वर्ष माझ्यासाठी खूपच चांगले गेले. समोर आलेल्या प्रत्येक संधीचे मी सोने केले. यापूर्वी काय झाले, याचा कधीच विचार केला नाही.’’ एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलत असतानाच रोहितने कसोटीसाठीदेखील सज्ज असल्याचे सांगितले. तो म्हणाला,‘‘कसोटी संघात स्थान कायम राखण्यासाठी मी उत्सुक आहे. सध्या कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.’’