निखिल नाईकच्या खेळीने महाराष्ट्राची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 January 2018

राजकोट - यष्टिरक्षक फलंदाज निखिल नाईक आणि पुनरागमन करणारा डॉमिनिक मुथ्थुस्वामी यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने सईद मुश्‍ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरातचा चार गडी राखून पराभव केला. 

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १५१ धावा केल्या. महाराष्ट्राने १९.३ षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या.  निखिल नाईकची ३७ चेंडूंतील नाबाद ७० धावांची खेळी निर्णायक ठरली.

राजकोट - यष्टिरक्षक फलंदाज निखिल नाईक आणि पुनरागमन करणारा डॉमिनिक मुथ्थुस्वामी यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने सईद मुश्‍ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरातचा चार गडी राखून पराभव केला. 

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १५१ धावा केल्या. महाराष्ट्राने १९.३ षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या.  निखिल नाईकची ३७ चेंडूंतील नाबाद ७० धावांची खेळी निर्णायक ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरवात आक्रमक असली तरी, त्यांच्या विकेट्‌सही झटपट पडल्या. ८ षटकांत ५० धावा करताना त्यांचे चार गडी बाद झाले होते. १२ षटकांत १०१ धावांचे आव्हान असताना एकत्र आलेल्या प्रयाग भाटी आणि निखिल नाईक यांची भागीदारी निर्णायक ठरली. त्यांनी २९ चेंडूंत ३७ धावा केल्या. त्या वेळी भाटी बाद झाला.

महाराष्ट्रासमोरील धोका कमी झालेला नव्हता. महाराष्ट्राला त्या वेळी ४६ चेंडूंत आणखी ६५ धावांची आवश्‍यकता होती. निखिलने फटकेबाजी करताना महाराष्ट्राला तीन चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. त्याने ३७ चेंडूंत ६ चौकार, २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. 

त्यापूर्वी, एक वर्षाने पदार्पण करणाऱ्या मुथ्थुस्वामीच्या अचूक गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी कच खाल्ली. अक्षर पटेल (३८) आणि चिराग गांधी (६१) यांच्यात सहाव्या विकेटसाठी झालेल्या ५७ धावांच्या भागीदारीमुळे त्यांना दीडशेची मजल शक्‍य झाली. मुथ्थुस्वामीने २७ धावांत ४ गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक - गुजरात २० षटकांत ८ बाद १५१ (चिराग गांधी ६१ -३७ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, अक्षर पटेल ३८, डॉमिनिक मुथ्थुस्वामी ४-२७) पराभूत वि. महाराष्ट्र १९.३ षटकांत ६ बाद १५४ (निखिल नाईक नाबाद ७० -३७ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, ऋतुराज गायकवाड २६, प्रयाग भाटी २३, पीयूष चावला ३-२७).

केदारच्या तंदुरुस्तीचे गूढ
भारतीय संघात निवड झालेल्या केदार जाधवला महाराष्ट्राने आजपासून सुरू झालेल्या टी २० स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात तो सामन्यात खेळलाच नाही. राहुल त्रिपाठीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. केदारच्या उपलब्धतेविषयी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाझ बागवान यांच्याशी संपर्क  साधला असता, त्यांनी केदार अनफिट असून तो पूर्ण स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेला केदार सध्या ‘हॅमस्ट्रिंग इंज्युरी’मुळे त्रस्त असून, बंगळूर येथील ‘बीसीसीआय’च्या पुनर्वसन केंद्रात उपचार घेत आहे. बागवान म्हणाले,‘‘केदारने आधी आपल्याला दोन सामने खेळण्याची परवानगी दिल्याचे कळवले होते. त्यानुसार तो शेवटचे दोन सामने खेळणार होता. मात्र, आज सकाळी वैद्यकीय अहवालानुसार तो अजूनही खेळण्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्त नसल्याचा अहवाल आल्याचे केदारनेच आपल्याला कळवले. आपल्याला खेळण्यास परवानगी नसल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे तो आता संपूर्ण स्पर्धेतच खेळणार नाही. राहुल त्रिपाठीच महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news said mushtaq ali t-20 cricket competition