सपोर्ट स्टाफ वाद संपणार; शास्त्री-प्रशासक समिती आज भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांचे नेमके सहकारी कोण, याचा वाद उद्या (ता. १८) संपण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासकीय समिती आणि रवी शास्त्री यांच्यात उद्या बैठक होणार असून, त्यात याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

मुंबई/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांचे नेमके सहकारी कोण, याचा वाद उद्या (ता. १८) संपण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासकीय समिती आणि रवी शास्त्री यांच्यात उद्या बैठक होणार असून, त्यात याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

भारत अरुण हे गोलंदाज मार्गदर्शक असावेत, तर संजय बांगर फलंदाज मार्गदर्शक यासाठी शास्त्री आग्रही असल्याचे समजते. सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीसाठी प्रशासकीय समितीने शास्त्री यांना सर्वाधिकार दिले असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भारत अरुण गोलंदाज मार्गदर्शक झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली होती, पण ही चर्चा भारत अरुण यांनीच तूर्त थांबवली आहे. 

गोलंदाज मार्गदर्शक म्हणून अद्याप आपली नियुक्ती झाली नसल्याचे भारत अरुण यांनी सांगितले. अरुण हे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, तसेच तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये व्हीबी थिरुवल्लूर संघाचे मार्गदर्शक आहेत. भारतीय संघाचे मार्गदर्शकपद लाभले तर मी आयपीएल, तसेच तमिळनाडू लीगमधील प्रशिक्षकपद सोडण्यास तयार आहे, असे अरुण यांनी सांगितले आहे. अरुण हे गतमोसमात देशांतर्गत स्पर्धेत हैदराबाद संघाचेही मार्गदर्शक होते. सपोर्ट स्टाफचे मानधन दोन कोटींपेक्षा जास्त असू नये, याबाबत प्रशासकीय समिती ठाम आहे. 

प्रशिक्षकालाच अधिकार हवेत - रॉबिन सिंग
माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनीदेखील सपोर्ट स्टाफची निवड करण्याचे अधिकार मुख्य प्रशिक्षकाला असावेत, असे मत मांडले आहे. 
सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीवरून आपले मत मांडताना रॉबिन सिंग म्हणाले,‘‘सपोर्ट स्टाफची निवड मुख्य प्रशिक्षक करणार असतील तर बिघडले कुठे ? मी जर प्रशिक्षक असतो तर मीदेखील पसंतीची नावे दिली असती. जेव्हा एकत्र काम करायचे असते, तेव्हा तुमचे विचार ज्याच्याशी जुळतील किंवा जुळतात अशांचीच साथ असणे आवश्‍यक असते.’’ रॉबिन सिंग तीन वर्षे गॅरी कर्स्टन यांच्या टीमध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षक होते. 

शास्त्रींचे मानधन कमी

भारतीय संघाचे नवे मार्गदर्शक रवी शास्त्री यांचे वार्षिक मानधन सात ते साडेसात कोटी रुपये असेल, असे सांगितले जात आहे. याबाबतचा निर्णय खास समिती घेणार असल्याचे समजते. मावळते मार्गदर्शक अनिल कुंबळे यांनी केलेल्या मागणीपेक्षा ही रक्कम दोन कोटींनी कमी असेल, असे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news shastri-administrative committee visit