शास्त्रींना मिळाली मनासारखी ‘टीम’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

भारत अरुण गोलंदाजी, श्रीधर क्षेत्ररक्षण, तर बांगर सहायक प्रशिक्षक

मुंबई - अनेक वादग्रस्त घडमोडींनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्याला हवी तशी ‘टीम’ मिळवून प्रशिक्षिकाचा पद्‌भार स्वीकारण्यापूर्वीच आपले वर्चस्व सिद्ध केले. 

भारत अरुण गोलंदाजी, श्रीधर क्षेत्ररक्षण, तर बांगर सहायक प्रशिक्षक

मुंबई - अनेक वादग्रस्त घडमोडींनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्याला हवी तशी ‘टीम’ मिळवून प्रशिक्षिकाचा पद्‌भार स्वीकारण्यापूर्वीच आपले वर्चस्व सिद्ध केले. 

रवी शास्त्री २०१४ ते २०१५ या कालावधीत भारतीय संघाचे संघ संचालक असताना भारत अरुण गोलंदाजीचे प्रशिक्षक होते; मात्र गेल्या वर्षी अनिल कुंबळे प्रशिक्षक झाल्यावर अरुण संघासोबत नव्हते. आता शास्त्री परतताच अरुण हे सपोर्ट स्टाफमध्ये परतले आहेत. शास्त्री यांच्याप्रमाणे अरुण यांचीही नियुक्ती २०१९ च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपर्यंत असेल. रवी शास्त्री यांनी आज प्रशासकीय समितीची मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात भेट घेतली आणि सपोर्ट स्टाफमधील नियुक्तींवर शिक्कामोर्तब केले. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांना बढती देण्यात आली असून, ते सहायक प्रशिक्षक असतील, तर आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून कायम असतील. शास्त्री यांच्या टीममध्ये फिजियो म्हणून पॅट्रिक फरहात आणि ट्रेनर शंकर बसू यांचेही स्थान कायम राहिले आहे. भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी उद्या बुधवारी रवाना होणार आहे. 

मी फक्त प्रश्‍नाचे उत्तर दिले
मुख्य प्रशिक्षकाच्या बरोबरीने द्रविड आणि झहीरच्या नावाची सपोर्ट स्टाफ म्हणून घोषणा करण्यात आली होती. याबाबत बोलताना हंगामी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले, ‘‘मी त्या वेळी फक्त प्रश्‍नाचे उत्तर दिले. त्यापेक्षा अधिक काही बोललोच नव्हतो. जेव्हा शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी सपोर्ट स्टाफची निवडदेखील तेच करणार हे निश्‍चित होते. तशी स्पष्ट कल्पना त्यांनी दिली होती. 

कोण आहेत भारत अरुण?
भारत अरुण हे १९८० मध्ये दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९ वर्षांखालील भारतीय संघात ते रवी शास्त्री यांचे सहकारी होते. भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक होण्याअगोदर अरुण हे १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. ते बंगाल रणजी संघाचेही प्रशिक्षक राहिलेले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही ते गोलंदाजीचे प्रशिक्षक राहिलेले आहेत.

झहीर खान गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याचे काम करू शकतो; पण त्याच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी अरुणसारख्या प्रशिक्षकाची संघात गरज आहे. झहीर आणि द्रविड या दोघांशी मी तीन-चार दिवस अगोदर चर्चा केली. त्यांचे मार्गदर्शन बहुमूल्य असेल.
- रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Shastri gets 'team'