हार्दिक पंड्याचा प्रतिहल्ला

सुनंदन लेले
Sunday, 7 January 2018

केपटाउन - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर आघाडीच्या फलंदाजांची भंबेरी उडाल्यानंतरही हार्दिक पंड्याचा प्रतिहल्ला आणि त्याला मिळालेली भुवनेश्‍वरची साथ यामुळे भारताला पहिल्या डावात द्विशतकी मजल शक्य झाली. दुसऱ्या दिवसअखेरीस द. आफ्रिकेने दोन बाद ६५ धावा करताना आपली आघाडी १४२ पर्यंत वाढवली. खेळ थांबला तेव्हा हशिम आमला ४ तर, कागिसो रबाडा २ धावांवर खेळत  होता. 

केपटाउन - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर आघाडीच्या फलंदाजांची भंबेरी उडाल्यानंतरही हार्दिक पंड्याचा प्रतिहल्ला आणि त्याला मिळालेली भुवनेश्‍वरची साथ यामुळे भारताला पहिल्या डावात द्विशतकी मजल शक्य झाली. दुसऱ्या दिवसअखेरीस द. आफ्रिकेने दोन बाद ६५ धावा करताना आपली आघाडी १४२ पर्यंत वाढवली. खेळ थांबला तेव्हा हशिम आमला ४ तर, कागिसो रबाडा २ धावांवर खेळत  होता. 

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारताचा डाव २०९ धावांत संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावांत ७७ धावांनी पिछाडीवर रहावे लागले. पंड्याने ९३, तर भुवनेश्‍वरने २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून व्हर्नान फिलॅंडर आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. 

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताची अपेक्षित घसरगुंडी झाली. व्हर्नान फिलॅंडर, डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांच्यासमोर भारताचे आघाडीचे फलंदाज टिकू शकले नाहीत. चेतेश्‍वर पुजाराचा अपवाद होता; पण तोदेखील उपाहारानंतर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अशा वेळी हार्दिक पंड्या आणि भुवनेश्‍वर कुमार यांनी ७ बाद ९२ धावसंख्येवर ९९ धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरून घेतला. 

दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू होताना रोहित शर्मावर लक्ष होते. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि अचूक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज अतिबचावात्मक आणि संथ खेळत होते. पहिल्या पाच षटकांनंतर रोहित शर्मा-चेतेश्‍वर पुजारा या नाबाद जोडीने पहिली धाव घेतली. या वेळी रबाडाला गोलंदाजी देण्याचा निर्णय अचूक ठरला. त्याने रोहित शर्माला चकवले. पहिल्या दोन तासांत भारताने केवळ रोहितची एकमेव विकेट गमावली असली, तरी धावांच्या आघाडीवर ते संथच होते.

उपाहारानंतरच्या पहिल्याच चेंडूवर फिलॅंडरने चेतेश्‍वर पुजाराला बाद केले. पुढच्या षटकात अश्‍विनला फिलॅंडरने बाद केले आणि सहाला स्टेनने पायचित केले. त्या वेळी दोन जीवदानांचा फायदा घेऊन हार्दिक पंड्याने आपल्या खास शैलीत गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना एक प्रकारे आव्हानच दिले. पंड्याला भुवनेश्‍वर कुमारने अत्यंत समंजस्य साथ दिली.

चहापानानंतर मॉर्केलने भुवनेश्‍वरला बाद करुन आफ्रिकेला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर रबाडाने पंड्याच्या जिगरबाज खेळीला पूर्णविराम दिला. त्याने १४ चौकार आणि १ षटकारासाह ९३ धावा केल्या. रबाडानेच बुमराला बाद करुन भारताचा डाव संपुष्टात आणला. 

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला डीन एल्गार आणि मार्करम यांनी चांगली सुरवात करून दिली. यानंतरही भारतीय डावाचा हिरो राहिलेल्या पंड्याने या दोघांनाही बाद करून खेळात रंगत आणली. दिवसअखेरीस आमलाने नाईट वॉचमन रबाडाच्या साथीत वेळ काढला. 

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका २८६, भारत पहिला डाव ः सर्वबाद २०९ (हार्दिक पंड्या ९३, भुवनेश्‍वर कुमार २५, व्हर्नान फिलॅंडर ३-३३, कागिसो रबाडा ३-३४, स्टेन २-५१, मॉर्केल २-५७)
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - २० षटकांत २ बाद ६५ : मार्करम ३४, एल्गर २५, पंड्या २-१०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news south africa india test cricket match