आम्ही चमत्कार घडवू शकतो - चंडिमल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 November 2017

नागपूर - घरच्या मैदानावर खेळत असलेला भारतीय संघ फॉर्ममध्ये असला, तरी आम्हीही या दौऱ्यात विजयाच्याच इराद्याने आलेलो आहोत. आमच्या संघात चमत्कार करण्याची क्षमता आहे. फलंदाज व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास आम्ही या दौऱ्यात चमत्कार करू शकतो, अशा शब्दात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने यजमान भारताला इशारा दिला आहे.

चंडिमल म्हणाला, ‘‘भारताला त्यांच्या भूमीवर पराभूत करणे सोपे नाही याची जाणीव आहे. त्यामुळे आमच्यापुढे निश्‍चितच फार मोठे आव्हान राहणार आहे. परंतु, आम्हीही विजयाच्याच इराद्याने भारतात आलो आहोत. कोलकाता कसोटीतील पहिल्या डावात आमच्या गोलंदाजांनी धमाल कामगिरी करून ते सिद्धही करून दाखविले. सर्व गोष्टी मनाप्रमाणे जुळून आल्यास आम्ही या सामन्यात भारतावर विजय मिळवू शकतो. तशी आमच्या खेळाडूंमध्ये क्षमतासुद्धा आहे.’’ ईडन गार्डन्सवरील कामगिरीवर समाधान व्यक्‍त करून चंडिमल म्हणाला, ‘‘पहिल्या दिवशी गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे चांगले प्रदर्शन केले. मात्र, त्यानंतर कामगिरीतील सातत्य राखता आले नाही. तथापि, त्या कसोटीत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. दुसऱ्या कसोटीत कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.’’

श्रीलंकेला या सामन्यात अनुभवी फिरकीपटू रंगना हेराथकडूनही खूप अपेक्षा असल्याचे त्याने सांगितले. खेळपट्टी अनुकूल मिळाल्यास तो निश्‍चितच प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकतो, असे सांगून नागपूर कसोटीत सहा फलंदाज व पाच ‘स्पेशॅलिस्ट’ गोलंदाजांसह उतरण्याचे त्याने संकेत दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Sri Lankan captain Dinesh Chandimal