श्रीलंका क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंना विमानातून उतरवले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 December 2017

कोलंबो/नवी दिल्ली - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघास आपली मंजुरी न घेतल्यामुळे श्रीलंका क्रीडामंत्र्यांनी रवाना होत असलेल्या नऊ खेळाडूंना विमानातून उतरवले. अखेर क्रीडामंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतरच संघ जाहीर झाला आणि खेळाडूंच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.

कोलंबो/नवी दिल्ली - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघास आपली मंजुरी न घेतल्यामुळे श्रीलंका क्रीडामंत्र्यांनी रवाना होत असलेल्या नऊ खेळाडूंना विमानातून उतरवले. अखेर क्रीडामंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतरच संघ जाहीर झाला आणि खेळाडूंच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.

हे खेळाडू भारतात येण्यासाठी विमानतळावर चेक इन झाल्यावर त्यांना परत बोलावण्याचा आदेश देण्यात आला. यापैकी एक खेळाडू तर विमानातही बसला होता, असे सांगितले जात आहे; मात्र या घडामोडींमुळे वेगळीच चर्चा भारतात सुरू झाली. कसोटी संघास प्रदूषणाचा त्रास होत आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन लढती उत्तर भारतातच आहेत. त्यांना याचा त्रास होऊ नये त्यामुळे श्रीलंका संघ माघारी बोलावण्याचा विचार करीत असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर काही संकेतस्थळांनी एकदिवसीय लढतींची तिकिटे काढण्यापूर्वी काही प्रतीक्षा करा, असा सल्लाही दिला. प्रत्यक्षात श्रीलंका क्रिकेट मंडळाने संघमंजुरीस पुरेसा वेळ न दिल्याने श्रीलंका क्रीडामंत्री संतापले होते.

श्रीलंकेतील सर्व राष्ट्रीय संघांना क्रीडामंत्र्यांची मंजुरी आवश्‍यक आहे. ‘श्रीलंका संघाची निवड १ डिसेंबरलाच झाली होती; पण काही खेळाडूंच्या समावेशाबाबत निवड समितीस खात्री नव्हती. त्यामुळे संघ अंतिम मंजुरीसाठी माझ्याकडे पाठवण्यास उशीर झाला,’ असे श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयसेखरा यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी संघाच्या प्रयाणापूर्वी तीन आठवडे मंजुरीसाठी पाठवणे आवश्‍यक असल्याचा कायदा करण्यात आला आहे. त्यांनी तर संघ प्रयाणापूर्वी तीन ते चार तास अगोदर पाठवला. त्यामुळे त्यांना परत बोलावण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

मी खेळाडूंच्या बाजूनेच आहे. थिसरा परेराने तर विमानातून मला फोन करून आम्ही फ्लाईट बोर्ड केले असल्याचे सांगितले. मी त्याची विनंती फेटाळली. एकदा सूट दिली असती तर ती वारंवार देणे भाग पडले असते, असे त्यांनी सांगितले. क्रीडामंत्र्यांनी यापूर्वीच तंदुरुस्त असलेल्या खेळाडूंचीच निवड बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

चंडीमल, मलिंगा संघाबाहेरच
श्रीलंकेने वन-डे मालिकेसाठी निवडलेल्या संघात अष्टपैलू असेला गुणरत्ने, मध्यमगती गोलंदाज नूवान प्रदीप, यष्टीरक्षक कुसल परेरा यांची निवड केली; पण दिनेश चंडीमल तसेच लसीथ मलिंगा संघाबाहेरच ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Sri Lankan sports minister removed the players from the plane