द. आफ्रिकेतील दुष्काळाची भारतीय क्रिकेटपटूंना 'झळ'

Wednesday, 3 January 2018

2 जानेवारी नवीन वर्ष 
2 जानेवारीला केपटाऊनला रात्री जेवणाकरता बाहेर पडल्याचा फायदा झाला. पार्लमेंट स्ट्रीट भागात चांगलीच गर्दी होती. मोठी मिरवणूक चालू होती ज्यात स्थानिक लोक रंगीबेरंगी कपड्यात नाचत गात होते. मिरवणुकीत सहभागी झाल्यावर समजले की 2 जानेवारीचा दिवस कित्येक वर्ष स्थानिक लोक नवीन वर्ष दिन म्हणून साजरा करतात. 

जोहान्सबर्गहून केपटाऊनला यायच्या विमान प्रवासात खिडकीतून बघायला मिळणारे दृश्‍य भयानक होते. सगळी जमीन पाण्याने तहानलेली सूर्याच्या तडाख्याने भाजलेली लालसर रंगाची होती आणि नद्या ओढे पूर्ण सुकलेले दिसत होते. केपटाऊनला पोहोचल्यावर जगातील सर्वांग सुंदर शहराला पाण्याच्या समस्येने कसे त्रासले आहे ते समजले. गेली दोन वर्ष केपटाऊन भागात दमदार पावसाने दडी मारली आहे. कधीतरी थोडा पाऊस पडतो. केपटाऊनला मोठे पर्वत असल्याने त्यावर ढग जमतात तेव्हा पर्वत माथ्यावर पाऊस पडतो. स्थानिक लोक ज्याला "कमिसा' म्हणतात त्या शुद्ध गोड पाण्याचे झरे वाहू लागतात. झरे वाहात शहराच्या चार भागात पोहोचतात. त्यातील एका झऱ्यावर आम्ही सकाळी 9वाजता गेलो असताना स्थानिक लोक महागड्या कार मधून येऊन हातातील डबे किंवा मोठ्या बादलीत पिण्याचे पाणी रोज भरून नेताना बघून कमाल वाटली. 

भारतीय संघातील खेळाडूंना पाण्याची समस्या किती गंभीर आहे हे जाणवले आहे. खेळाडूंना भेटल्यावर समजले की, पंचतारांकित हॉटेलात व्यवस्थापनाकडून विनंती केली जात आहे की 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ अांघोळीकरता शॉवर शक्‍यतो वापरू नका. इतर वेळी केपटाऊनला पिण्याचे पाणी सहजी पत्रकार कक्षात दिले जायचे. आता प्रत्येक पत्रकाराला मोजून 1 लीटर पाणी दिले जात आहे.

न्युलंडस्‌ मैदानावर गेल्यावर मैदानाची देखभाल करणाऱ्या माळ्यांची गाठ घेतली. "आठवड्यात फक्त तीन वेळा आम्ही बाहेरील मैदानाला पाणी देत आहोत इतके पाणी जपून वापरायची गरज आहे'', मैदानाची तयारी करणारे माळी सांगत होते. "पहिल्या कसोटी सामन्याकरता तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्टीवर नक्की किती पाणी मारावे याचा आम्हालाही अंदाज लागत नाही. कारण खालची जमीन पाण्याने तहानलेली आहे. किती पाणी दिल्यावर विकेटवरील गवत हिरवे राहायची शक्‍यता वाढेल याचा अंदाज घेताना आमची धावपळ होते आहे'', माळ्याने सांगितले. खेळपट्टी कोरडी आणि त्यावरील माती मोकळी झाली तर त्याचा फायदा भारतीय फिरकी गोलंदाजाला होऊ शकतो हे माळी जाणून असल्याने त्यांची काळजी समजते आहे. 

दरम्यान कसोटीच्या तयारीकरता भारतीय संघाचा सराव जोरदार चालू आहे. फलंदाजांकडून प्रशिक्षक संजय बांगर आखूड टप्प्याच्या माऱ्याला तोंड देण्याची तयारी करून घेत आहे. गोलंदाजीचा प्रशिक्षक भारत अरुण वेगवान गोलंदाजांना चेंडू पुढे टाकायला प्रोत्साहन देत होता. "दक्षिण आफ्रिकेत खेळताना मिळणाऱ्या उसळीने गोलंदाज भारावून जातात आणि आखूड टप्पा टाकायची चूक करतात हे जाणून आम्ही आपल्या गोलंदाजांना पुढे टप्पा टाकायला सांगत आहोत'', भारत अरुण आणि रवी शास्त्री म्हणाले. 

सामन्याअगोदरच्या दिवसात केपटाऊनला टळटळीत ऊन नांदत असल्याने मैदानावर आणि खेळपट्टीवर त्याचा काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यात सगळे गुंग आहेत. 

2 जानेवारी नवीन वर्ष 
2 जानेवारीला केपटाऊनला रात्री जेवणाकरता बाहेर पडल्याचा फायदा झाला. पार्लमेंट स्ट्रीट भागात चांगलीच गर्दी होती. मोठी मिरवणूक चालू होती ज्यात स्थानिक लोक रंगीबेरंगी कपड्यात नाचत गात होते. मिरवणुकीत सहभागी झाल्यावर समजले की 2 जानेवारीचा दिवस कित्येक वर्ष स्थानिक लोक नवीन वर्ष दिन म्हणून साजरा करतात. 

अजून खोलात जाऊन चौकशी करता खरी मजेदार माहिती समजली. वर्णद्वेषी राजवट दक्षिण आफ्रिकेत चालू असताना गोऱ्या वर्णाचे लोक 31 डिसेंबरची रात्र जोरदार पार्टी करायचे. सगळे कृष्ण वर्णीय लोक गोऱ्या लोकांची पार्टी चांगली व्हावी म्हणून राब राब राबायचे. पार्टी 1 तारखेला पहाटे पर्यंत चालायची पार्टीनंतरचे आवरण्यात नोकरदार लोकांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस जायचा. मग त्यांना जरा वेळ मिळायचा. म्हणून 2जानेवारीला कृष्णवर्णीय लोक नवीन वर्ष साजरे करायचे. 

वर्णद्वेषी राजवट संपून तीन दशके होत आली तरी स्थानिक लोक 2 जानेवारीच्या पार्टीची परंपरा चालू ठेवण्यात मागे पडत नाहीत. एकदम रंगीत कपडे घालून नाचत गात केपटाऊनचे लोक नवीन वर्ष 2 जानेवारीला साजरे करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports news Sunandan Lele writes about South Africa drought situation