esakal | दुसरी टी-२० लढत आज
sakal

बोलून बातमी शोधा

दुसरी टी-२० लढत आज

दुसरी टी-२० लढत आज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुवाहाटी - धडाकेबाज खेळ करणारी विराटसेना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतला उद्या होणारा दुसरा सामना जिंकला तर भारतीय संघ ही मोहीमही फत्ते करू शकेल. या सामन्याद्वारे भारतात आणखी एक स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे.  

गुवाहाटीमधील एसीए बरासपाडा स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. इंदूरमधील अखेरच्या सामन्याअगोदर ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघालाच अधिक पसंती आहे. 

पावसाचा व्यत्यय आलेल्या रांचीतील पहिल्या सामन्यात भारताला सहा षटके फलंदाजीसाठी मिळाली. त्यातही ४८ धावांचे विजयी लक्ष्य सहज पार करून भारतीयांनी ऑस्ट्रेलियावरचे आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० द्वंद्वामध्ये भारत आघाडीवर राहिलेला आहे. १४ सामन्यांमध्ये दहा सामने भारताने जिंकलेले आहेत. यामध्ये सलग सात विजयांची मालिका गुंफलेली आहे. २८ सप्टेंबर २०१२ पासून ही विजयी मालिका सुरू केलेली आहे. 

अगोदरच बॅकफूटवर गेलेला ऑस्ट्रेलियाचा संघ स्टीव स्मिथशिवाय खेळत आहे. त्याच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरकडे भारतात आयपीएलच्या माध्यमातून टी-२० खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने आपल्या सनरायझर्स संघाला विजेतेपदही मिळवून दिलेले आहे. त्याचबरोबर तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही राहिलेला आहे; परंतु ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना त्याला पहिल्या सामन्यात अपयश आलेले आहे. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांचे कोडे सोडवताना ऑस्ट्रेलिया फलंदाजांच्या नाकी दम येत आहे. चार एकदिवसीय आणि एक टी अशा पाच सामन्यांत मिळून या दोघांनी १६ विकेट मिळवलेल्या आहेत. 
ग्लेन मॅक्‍सवेलचे अपयश ऑस्ट्रेलियाच्या पराभवात उठून दिसत आहे.

त्याला ३९, १४, ५, १७ अशाच धावा करता आलेल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वीच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवच्या चायनामनवर तो ‘मामा’ बनला होता. त्यानंतर तो या मर्यादित षटकांच्या मालिकेत कुलदीपवर ठरवून हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र यादरम्यान तो चारही वेळेस चहलच्या चेंडूवर बाद झालेला आहे.

loading image
go to top