esakal | पावसामुळे सामना निसटला - कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli

पावसामुळे सामना निसटला - कोहली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात १८८ धावांचा बचाव करण्यात अपयश आल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने अपयशाचे खापर सहकाऱ्यांवर न फोडता, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणे कठीण गेले. पावसामुळे आधी गोलंदाजांच्या हातून चेंडू निसटू लागला आणि नंतर सामना आमच्या हातून निसटला, असे सांगितले.

भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक फटका युजवेंद्र चहलला बसला. त्याच्या चार षटकांत तब्बल ६४ धावा निघाल्या. कोहली म्हणाला, ‘‘झटपट गडी बाद झाल्यावर मनीष आणि धोनी यांच्या फटकेबाजीमुळे आम्हाला भक्कम आव्हान उभे करता आले होते; पण नंतर पावसामुळे गोलंदाजांना चेंडूवर ‘ग्रिप’ मिळविणे कठीण गेले. बाराव्या षटकापर्यंत सगळे सुरळीत सुरू होते. त्या वेळी सुरू झालेल्या बारीक पावसामुळे चित्र बदलले. ‘विकेट’ स्थिर झाली आणि गोलंदाजांना ‘ग्रिप’ मिळत नव्हती. चेंडू गोलंदाजांच्या हातून निसटत होता आणि नंतर आमच्या हातून सामना निसटला.’’

कोहलीने अर्थातच दक्षिण आफ्रिका संघाचे प्रयत्नही चांगले असल्याचे स्पष्ट केले. तो म्हणाला,‘‘क्‍लासेन आणि ड्युमिनी यांनी कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून फलंदाजी केली. सामना जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेली विजीगुषीवृत्ती त्यांनी दाखवली. त्यामुळे आजच्या विजयास ते नक्कीच पात्र होते.’’

प्रतिस्पर्धी कर्णधार ड्युमिनी याने सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला,‘‘आमची गोलंदाजी चांगली झाली. अखेरची पाच षटके महाग पडली; पण फलंदाजांनी त्यावर कडी केली. पावसाळी हवामान आणि डकवर्थ-लुईसचे समीकरण डोळ्यांसमोर ठेवूनच फलंदाजी केली. त्याचा फायदा आम्हाला झाला. पावसाचा जोर वाढत होता, तेव्हा डकवर्थ-लुईस नियमाचे आकडे सामना आमच्या बाजूने झुकल्याचे दाखवत होते. त्यातही क्‍लासेनने केलेली फटकेबाजी स्वप्नवत होती. त्याचे ‘टायमिंग’ अचूक झाले. अखेरच्या सामन्यातील रंगत आता आणखी वाढली.’’