esakal | कसोटी क्रिकेटला परमोच्च प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

कसोटी क्रिकेटला परमोच्च प्राधान्य

कसोटी क्रिकेटला परमोच्च प्राधान्य

sakal_logo
By
पीटीआय

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचा पुनरुच्चार

नवी दिल्ली - जागतिक दर्जाचे आणखी खेळाडू निर्माण करायचे असतील तर भारताने जास्त कसोटी सामने खेळले पाहिजेत. टी-२० आणि वन-डेमुळे महिला क्रिकेटला चालना मिळत असली, तरी कसोटी क्रिकेट हेच परमोच्च आव्हान आहे, असे प्रतिपादन भारतीय कर्णधार मिताली राज हिने केले.

मितालीला १८ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ दहा कसोटी खेळायची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत भारत केवळ पाच कसोटी खेळू शकला आहे.

महिला क्रिकेटमध्ये ॲशेस अर्थात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ही मालिका नियमित होते. इतर संघ प्रामुख्याने झटपट क्रिकेट खेळतात. मितालीने सांगितले, की कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंचा दृष्टिकोन, कौशल्य आणि दमसास पणास लागतो. सध्या प्रामुख्याने टी-२० आणि वन-डेच्या माध्यमातून विविध मंडळे महिला क्रिकेटला चालना देतात. हे दोन फॉरमॅट मार्केटिंगसाठी आदर्श असल्याचे प्रत्येक मंडळाला वाटते, पण झटपट क्रिकेटइतकेच कसोटी सामने व्हायला हवेत. भारतीय संघाला कसोटी सामने खेळायचे असतील तर इतर संघसुद्धा त्यासाठी तयार झाले पाहिजेत.

रेल्वेला श्रेय
मितालीने दर्जेदार खेळाडू घडविण्यात रेल्वेने मोठे योगदान दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. तिने सांगितले, की भारतीय रेल्वेचा खास उल्लेख केला पाहिजे. रेल्वेने आम्हाला सातत्याने पाठिंबा दिला. क्रिकेट खेळणाऱ्या मुलींना नोकऱ्या दिल्या. रेल्वेचा पाठिंबा मिळाला नसता तर अनेक जणींना आर्थिक स्थैर्यासाठी नोकरी मिळविण्यावर लक्ष केंद्रित करावे लागले असते.

मितालीला खास बढती
दक्षिण-मध्य रेल्वेने मितालीला खास बढती दिली. तिला ‘चीफ ऑफिस सुपरीन्टेडंट’ हे पद देण्यात आले. ती आता ‘ब’ दर्जाची राजपत्रित अधिकारी बनली आहे. मिताली हैदराबादमधील मुख्यालयातच नोकरी करते.

रेल्वेकडून प्रत्येकी तेरा लाख
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी विश्‍वकरंडक उपविजेत्या भारतीय संघातील दहा खेळाडूंना प्रत्येकी १३ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्यांना बढती देण्याची घोषणा यापूर्वीच झाली होती.