उमेश यादव ‘होमग्राउंड’वर प्रथमच खेळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

नागपूर - सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आतापर्यंत नागपुरात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, हे वाचून अनेकांना आश्‍चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे. गेल्या सात वर्षांमध्ये जामठा स्टेडियमवर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले गेले. उमेशही ३५ कसोटी, ७१ वनडे आणि एक टी-२० सामना खेळला. परंतु, एकदाही वैदर्भी चाहत्यांना जामठा स्टेडियमवर त्याची गोलंदाजी पाहण्याची संधी मिळाली नाही. आता ती प्रतीक्षा संपणार आहे. 

श्रीलंकेविरुद्ध उद्यापासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश ‘होमग्राउंड’वर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची पुरेपूर शक्‍यता आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्यामुळे भारत या सामन्यातही तीन मध्यमगती गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. तसे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. त्यामुळे महंमद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश हे वेगवान त्रिकूट खेळणे जवळपास निश्‍चित आहे. 

उमेशने पहिल्या कसोटीत तीन गडी बाद करून भुवनेश्‍वर व शमीला उत्तम साथ दिली होती. तो आतापर्यंत एकूण १०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्‍टोबर महिन्यात जामठा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्याच्या वेळी उमेशचा वनडे संघात समावेश होता. मात्र, कर्णधार विराटने त्याला अकरामध्ये स्थान दिले नव्हते. या वेळी तसे घडण्याची शक्‍यता कमीच आहे.   

कसोटी बळींच्या शतकाची संधी 
या सामन्याच्या निमित्ताने उमेशला कसोटी बळींचे शतक पूर्ण करण्याचीही संधी मिळणार आहे. ३० वर्षीय उमेशने आतापर्यंत ३५ कसोटी सामन्यांमध्ये ३५.८९ च्या सरासरीने व ३.६९ च्या इकॉनॉमी रेटने ९७ गडी बाद केले आहेत. आणखी तीन बळी मिळाल्यास त्याचे कसोटी बळींचे शतक पूर्ण होईल. ‘होमग्राउंड’वरील पदार्पणाच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केल्यास ‘सोने पे सुहागा’च ठरेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news umesh yadav cricket nagpur