विराटला शांत ठेवून बाद करण्याचा ‘प्लॅन’च होता - फिलॅंडर

पीटीआय
Wednesday, 10 January 2018

केप टाऊन - आक्रमक शैली असलेल्या विराट कोहलीला शांत (फटकेबाजी न करू देणे) ठेवण्याचे आणि त्यानंतर त्याला बाद करण्याचे डावपेच आम्ही आखले होते आणि विशेष म्हणजे हे सर्व या डावपेचांची अचूक अंमलबजावणीही केली, असे गुपित भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवणाऱ्या वॅरनॉन फिलॅंडरने उघड केले. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ७२ धावांनी विजय मिळवल्यावर फिलॅंडरने ही माहिती दिली.

विराट हा दर्जेदार फलंदाज आहे. त्याला बाद करण्यासाठी प्रथम त्याला शांत ठेवणे आवश्‍यक असते. अशा प्रकारे आम्ही तयारी केली आणि माझ्या भात्यात आत येणाऱ्या चेंडूचे (इनस्विंग) प्रभावी अस्त्र आहे. मोक्‍याच्या वेळी हा चेंडू टाकून त्याला बाद करण्याचे आम्ही डावपेच तयार केले होते, असे फिलॅंडरने सांगितले. दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने ४२ धावांत ६ बळी अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी काल नोंदवली.

या प्लाननुसार मी त्याला साधारणतः अडीच षटके सर्व आउट स्विंग टाकले (बाहेर जाणारे चेंडू) आणि बरोबर एक चेंडू इनस्विंग टाकला आणि त्याच चेंडूवर तो पायचित झाला, असे फिलॅंडर म्हणाला. विराट कोहली डावाच्या सुरवातीस उजव्या यष्टिबाहेर जाणारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच प्रयत्नात तो पहिल्या डावात मॉर्कलच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या डावात त्याने बाहेर जाणारे चेंडू जाणीवपूर्वक सोडून दिले होते; परंतु मधल्या यष्टीवरचा चेंडू तो ॲक्रॉस खेळला आणि फिलॅंडरच्या सापळ्यात तो अडकला.

विराटला चिडवले नाही
विराटला बाद केल्यानंतर त्याला उद्देशून तू काही वक्तव्य केले का? या प्रश्‍नावर फिलॅंडरने स्पष्ट शब्दांत नकार दिला. मी त्याच्याकडे पाहून काहीही बोललो नाही. भारतीय संघातील मौल्यवान विकेट मिळवल्याचा मी सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला किंवा त्या क्षणाची ती ‘रिॲक्‍शन’ होती, असे फिलॅंडरने सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news vernon philander talking