esakal | मुंबईचा जेतेपदाचा दुष्काळ कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

मुंबईचा जेतेपदाचा दुष्काळ कायम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्‍वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही मुंबईला सव्वादोनशेही धावा करता आल्या नाहीत. तिथेच त्यांची हार निश्‍चित झाली. 

महाराष्ट्राने जणू मुंबईला उत्तम सांघिक खेळ कसा करावा, हेच दाखवले. महाराष्ट्रविरुद्ध डाव न संपल्याचे समाधानच मुंबईस लाभले. सूर्यकुमार यादव सोडल्यास कोणासही अर्धशतक करता आले नाही. दिल्लीच्या पालम येथील एअर फोर्स मैदानावरील खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येत होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या फलंदाजांनी पारंपरिक आक्रमकतेस मुरड घातली. अर्थात, लक्ष्य अवघड नसल्यामुळे त्यांचे काम सोपे होते. त्यांनी मुंबईला कोणतीही संधी न देता सात विकेट आणि १९ चेंडू राखून बाजी मारली.

मध्यमगती गोलंदाज प्रदीप दाढेने मुंबईला हादरे दिले; तसेच ऑफ स्पिनर प्रशांत कोरे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव यांनी आक्रमणाची कोणतीही संधी दिली नाही. पृथ्वी शॉला आक्रमक आणि बचावाची योग्य सांगड घालता आली नाही. सलामीस बढती दिल्यानंतरही आदित्य तरे फार काही करू शकला नाही. 

श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे मुंबईचे स्टार फलंदाज १२ षटके एकमेकांच्या साथीत होते; पण त्यांना ४७ धावाच जोडता आल्या. त्यावरून महाराष्ट्राच्या अचूक गोलंदाजीची कल्पना येईल. त्याचबरोबर मुंबई फलंदाजांच्या मर्यादांची. सूर्यकुमार यादव आणि शम्स मुलानीने ४८ धावा जोडत आशा दाखवल्या; पण यादव परतला त्याचवेळी मुंबईच्या आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या आशा संपल्या. 

ऋतुराज गायकवाडला टिपत मुंबईने सुरुवात चांगली केली; पण श्रीकांत मुंढे आणि राहुल त्रिपाठीने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावा जोडत पायाभरणी भक्कम केली. हे दोघे तीन चेंडूत परतले; पण अंकित बावणे-नौशाद शेखने मुंबईला कोणतीही संधी दिली नाही. 

संक्षिप्त धावफलक
मुंबई - ९ बाद २२२ (पृथ्वी शॉ १२ चेंडूंत २ चौकार, आदित्य तरे १६- २४ चेंडूंत ३ चौकार, सिद्धेश लाड ५, श्रेयस अय्यर ३५- ५५ चेंडूंत ३ चौकार, सूर्यकुमार यादव ६९- ८८ चेंडूंत ७ चौकार, शम्स मुलानी २२, शुभम रांजणे १८, धवल कुलकर्णी नाबाद २३, प्रदीप दाढे १०-०-५७-३, प्रशांत कोरे १०-०-३४-२) पराजित वि. महाराष्ट्र - ४६.५ षटकात ३ बाद २२४ (ऋतुराज गायकवाड १२, श्रीकांत मुंढे ७०- ९५ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार, राहुल त्रिपाठी ४९- ७३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार, अंकित बावणे नाबाद ३७- ६० चेंडूंत १ चौकार, नौशाद शेख नाबाद ५१- ४० चेंडूंत ५ चौकार, शिवम मल्होत्रा ६-०-२९-१, शम्स मुलानी १०-०-४५-१).

loading image