कोहलीचा आता मानधनवाढीसाठी ‘स्टान्स’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 November 2017

नागपूर - क्रिकेटच्या मालिका नियोजनावर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आता क्रिकेटपटूंच्या मानधनवाढीसाठी ‘स्टान्स’ घेतला आहे. क्रिकेट मंडळाला होणाऱ्या नफ्यातील क्रिकेटपटूंना मिळणारा हिस्सा वाढविण्याची मागणी त्याने केली आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याचवर्षी भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली होती. संघातील उच्च श्रेणी असलेल्या क्रिकेटपटूंना त्यानुसार जवळपास २ कोटी रुपये इतके मानधन मिळते. 

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १) ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीत खेळाडूंच्या वतीने कोहली हा मुद्दा उपस्थित करू शकतो.‘बीसीसीआय’ने याच वर्षी स्टार इंडियाशी मोठा करार केला असून, त्यानुसार २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी ‘आयपीएल’ प्रसारणाचे अधिकार त्यांनी मिळविले आहेत. करारानुसार स्टार इंडिया ‘बीसीसीआय’ला तब्बल २.५ अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम देणार आहे. त्यातच भारतीय क्रिकेटपटूंचे करार ३० सप्टेंबर रोजी संपले आहेत. त्यामुळेच मानधनाबरोबरच मंडळाच्या नफ्यातील हिस्सा वाढविण्याची मागणी खेळाडूंकडून होऊ शकते असेही हा पदाधिकारी म्हणाला. यासाठी कोहली कमालीचा आग्रही असून, सहकारी महेंद्रसिंह धोनी, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तो लवकरच ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रशासक विनोद राय यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही मागणी करणार आहे. 

चर्चेसाठी खेळाडूंचे स्वागत
नेमक्‍या याच मुद्यावरून याच वर्षी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांच्यातील वाद कमालीचा ताणला गेला होता. अर्थात, तो तुटण्यापूर्वीच त्यावर तोडगा निघाल्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी बहिष्काराचा विचार रद्द केला होता. हा वाद लक्षात घेऊन ‘बीसीसीआय’ सुरवातीपासून खेळाडूंच्या प्रस्तावाचे स्वागत करण्याची किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. ‘बीसीसीआय’चा हा पदाधिकारी म्हणाला, ‘‘कुठल्यात कामात पारदर्शकता असणे केव्हाही चांगले असते. आमचाही तोच प्रयत्न आहे. त्यामुळे मानधन वाढीच्या चर्चेसाठी येणाऱ्या कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे स्वागतच असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य प्रशासक विनोद राय त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत.

बदल निश्‍चित
क्रिकेटपटूंच्या मानधन रचनेत बदल होणार हे निश्‍चित आहे. मुख्य प्रशासक विनोद राय यांनीच तसे सुतोवाच केले आहेत. ते म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेटपटूंना सध्या श्रेणीनुसार मानधन मिळते. यासाठी तीन श्रेणी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. आम्ही यात बदल केले आहेत. त्या संदर्भात खेळाडूंशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या असून, आता नवी दिल्लीत होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्या दरम्यान आणखी एकदा त्यांच्याशी चर्चा होईल आणि ती अंतिम असेल अशी आम्हाला आशा आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news virat kohli bcci