esakal | विराट कोहलीची नेटाने फलंदाजी
sakal

बोलून बातमी शोधा

विराट कोहलीची नेटाने फलंदाजी

विराट कोहलीची नेटाने फलंदाजी

sakal_logo
By
सुनंदन लेले

सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी सामन्यातही दुसऱ्याच दिवशी वर्चस्वाचे हेलकावे पाहायला मिळत आहेत. फलंदाजीला साथ मिळते, असे वाटत असतानाच विकेट पडत आहेत. त्यामुळेच दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत नेटाने उभ्या राहिलेल्या विराट कोहलीमुळेच भारताच्या डावाला स्थिरता आली.

दुसऱ्या दिवशी रविवारी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांना फारसे डोईजड होऊ दिले नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिसने एका बाजूने अर्धशतकी खेळी केल्यानंतरही त्यांचा डाव ३३५ धावांपर्यंतच पोचू शकला. अश्‍विनने चार; तर इशांत शर्माने तीन गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ बाद १८३ धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली ८५; तर हार्दिक पंड्या ११ धावांवर खेळत होता. 

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ होत असताना दक्षिण आफ्रिकेची मुख्य मदार कर्णधार फाफ डू प्लेसिसवर होती. केशव महाराजला महंमद शमीने बाद केले. रबाडाला बाद करण्यात अश्‍विनने जान लावली होती; पण लागोपाठच्या चेंडूंवर रबाडाचे दोन झेल सुटले. पंड्याने नंतर रबाडाचा कठीण झेल पकडला. डू प्लेसिसला ईशांत शर्माने बाद करून मार्गातील मोठा अडथळा दूर केला. मॉर्केलला बाद करून अश्‍विनने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला पूर्णविराम दिला. 

भारताची फलंदाजी चालू झाल्यावर विजय-राहुलची जोडी चांगली खेळू लागली. दोघांनी चेंडूचा बरोबर अंदाज घेत गोलदांजांना तोंड दिले. दहाव्या षटकात दोन धक्के बसले. प्रथम राहुल मॉर्केलला बाद झाला आणि पुढच्या चेंडूवर  शक्‍य नसलेली धावा पळताना चेतेश्‍वर पुजारा धावबाद झाला. पदार्पण करणाऱ्या लुंगी एन्गिडीने पुजाराला थेट चेंडू फेक करत धावबाद केले. मुरली विजय आणि विराट कोहलीने मग डाव सांभाळला. 

चहापानानंतरही विजय-कोहली यांनी भारताचा धावफलक हलता ठेवला होता. महाराजला सातत्याने स्क्वेअर कट मारणारा विजय शेवटी तसाच फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. कोहली-विजय जोडीने ७९ धावा जोडल्या. त्यानंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा निराशा केली. कोहलीला पार्थिव पटेलचीही साथ मिळू शकली नाही. दिवसअखेरीस हार्दिक पंड्याने कोहलीला साथ देत भारताचे आणखी नुकसान टाळले.
 

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका ११३.५ षटकांत सर्वबाद ३३५ (एडन मार्करम ९४, आमला ८२, फाफ डू प्लेसिस ६३, आर. अश्‍विन ४-११३, ईशांत ३-४६) भारत पहिला डाव ६१ षटकांत ५ बाद १८३ (कोहली खेळत आहे ८३, विजय ४६, हार्दिक पंड्या खेळत आहे ११, महाराज १-५६, मॉर्केल १-४७)

loading image
go to top