चुका नाही, घोडचुका झाल्या : विराट कोहली

Thursday, 18 January 2018

परदेशातील अपयशाबाबत बोलताना कोहली म्हणाला, "सध्या कुठल्याच संघाची परदेशात चांगली कामगिरी होत नाहीये. याचा अर्थ मी आमच्या पराभवाचे समर्थन करतोयं असे नाही. आम्ही चुका केल्या. त्याचे फळ आम्हाला मिळाले. दोन्ही सामन्यांत आम्हाला विजयाची चांगली संधी होती. ती आम्ही दवडली. कुणा एकाला नाही, तर संपूर्ण संघाने अपयशाची जबाबदारी घ्यायला हवी.'' 

सेंच्युरियन : भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा पराभव ओढवून घेतला. सलग दुसऱ्या कसोटीत फलंदाजांच्या अपयशाने निराश झालेला भारतीय कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत आपली निराशा लपवू शकला नाही. "खेळात हार जीत होतच असते. पण, अशा खेळाचे काय समर्थन करायचे अशी निराश प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. 

कोहली म्हणाला, "पहिल्या पराभवाचे जितके वाईट वाटले नाही, त्याही पेक्षा हा पराभव पाहून वाईट वाटले. पहिला सामना हरल्यानंतरही आमचे फलंदाज काही शिकले नाहीत. या सामन्यात आम्ही चुका नाही, तर घोडचुका केल्या. संघातील प्रत्येक खेळाडूंनी एकत्र बसून मोकळेपणाने बोलून आपण काय चुका केल्या याविषयी बोलण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत ही मोकळेपणाने चर्चा होत नाही, तोवर सुधारण्यास वाव नाही.'' 

पराभवाचे कारण शोधताना कोहलीने क्रिकेटच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर समन्वय नसल्याने ही वेळ आल्याचे सांगितले. तो म्हणाला, "गेल्या दौऱ्यात आमची फलंदाजी चांगली झाली होती. गोलंदाजांना लय गवसत नव्हती. या वेळी चित्र बरोबर उलटे आहे. फलंदाजांना आता तरी खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे.'' 

परदेशातील अपयशाबाबत बोलताना कोहली म्हणाला, "सध्या कुठल्याच संघाची परदेशात चांगली कामगिरी होत नाहीये. याचा अर्थ मी आमच्या पराभवाचे समर्थन करतोयं असे नाही. आम्ही चुका केल्या. त्याचे फळ आम्हाला मिळाले. दोन्ही सामन्यांत आम्हाला विजयाची चांगली संधी होती. ती आम्ही दवडली. कुणा एकाला नाही, तर संपूर्ण संघाने अपयशाची जबाबदारी घ्यायला हवी.'' 

प्रतिकूल परिस्थितीत विजय 
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेला विजय असे या विजयाचे वर्णन केले. तो म्हणाला, "घरच्या मैदानावर खेळताना यजमान संघाच्या बलस्थानांना पोषक अशी खेळपट्टी बनवली जाते. पण, ही खेळपट्टी तशी नव्हती. वेगवान विकेटची अपेक्षा नव्हती. पण, खेळपट्टीत उसळी किंवा वेग हवा होता इतकीच आमची अपेक्षा होती. तरी तिसऱ्या दिवसांनंतर बदलत जाणाऱ्या खेळपट्टीवर आमच्या खेळाडूंनी दाखवलेला संयम महत्त्वाचा होता. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत मिळविल्याचा आनंद अधिक वाटतो.'' 

डू प्लेसिसने संघातील प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले. तो म्हणाला, "या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते. त्यानंतर ज्येष्ठ खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे अपेक्षित होते. पहिल्या डावात हाशिम आमला, तर दुसऱ्या डावात डिव्हिलर्सने ती करून दाखवली. त्याही पेक्षा मार्करम, रबाडा, एन्गिडी हे तरुण खेळाडूदेखील जीव तोडून खेळले. संघ निवडीत साधलेला समन्वय जेव्हा मैदानातही दिसून येतो तेव्हा खरे समाधान मिळते.'' डू प्लेसिसने सामन्याचे वर्णन करताना दोन्ही संघांना समान संधी होती. आम्ही ती साधली आणि भारतीय फलंदाजांना क्षमता असूनही ती साधता आली नाही, अशी खोचक टिप्पणी मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports news Virat Kohli statement on Indian team loss against South Africa