esakal | विंडीज क्रिकेट संघाचा पाकमध्ये खेळण्यास नकार
sakal

बोलून बातमी शोधा

विंडीज क्रिकेट संघाचा पाकमध्ये खेळण्यास नकार

विंडीज क्रिकेट संघाचा पाकमध्ये खेळण्यास नकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला, त्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने पाकिस्तानात होणारी मालिका लांबणीवर टाकली आहे. ही मालिका आता पुढील वर्षी होणार असल्याचा दावा पाक मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत.

ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड, ड्‌वेन ब्राव्हो या विंडीज संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पाकमध्ये खेळण्याची आपली तयारी नसल्याचे विंडीज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले. आयसीसीच्या सुरक्षा पथकाने वेस्ट इंडीजला खेळण्यास हिरवा कंदील दाखवला होता. या मालिकेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असेल असेही या अहवालात म्हटले होते, पण विंडीज खेळाडू संघटनेने तरीही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे हा दौरा होणार नसल्याचे विंडीज मंडळाने पाक मंडळास कळवले आहे.

पाकिस्तान मंडळाने विंडीज निर्णयाबद्दल टिप्पणी करणे टाळले आहे, पण पुढील वर्षीचा दोन्ही संघांचा कार्यक्रम पाहून ही मालिका होईल, असे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्याने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर सांगितले.

जागतिक संघ सप्टेंबर महिन्यात पाकमध्ये तीन सामने खेळला होता; तर श्रीलंका संघही एक ट्‌वेंटी २० खेळला. या सर्व लढती सुरळीतपणे पार पडल्या होत्या, याकडे पाक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले, पण विंडीज खेळाडू आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता पाक मंडळाचे काही पदाधिकारी लाहोरमधील वाढत्या धुक्‍यामुळे सामने घेण्यात अडचणी येत असल्याचा दावा करीत होते. विंडीज संघ २५ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडला जात आहे, त्यामुळे सामन्यांसाठी पुरेसा वेळ नसल्याचाही दावा केला जात आहे.

loading image