सर्वोच्च धावसंख्या; तरीही महिलांची हार

वृत्तसंस्था
Monday, 26 March 2018

मुंबई - भारतीय महिला संघाने टी- २० क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली, तरीही त्यांना तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत हार पत्करावीच लागली. यामुळे या स्पर्धेत आगेकूच करण्याच्या भारताच्या आशाच संपुष्टात आल्या. 

मुंबई - भारतीय महिला संघाने टी- २० क्रिकेटमधील आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली, तरीही त्यांना तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत हार पत्करावीच लागली. यामुळे या स्पर्धेत आगेकूच करण्याच्या भारताच्या आशाच संपुष्टात आल्या. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीयांनी आपली जवळपास एका महिन्यापूर्वीची (१३ फेब्रुवारी) ३ बाद १६८ ही सर्वोच्च धावसंख्या मागे टाकताना या स्पर्धेत सव्वाशेच्या आसपास धावा करण्याची मालिकाही खंडित केली. भारताने ४ बाद १९८ धावांचा तडाखा दिला खरा, पण डॅनियल वॅट हिने जबरदस्त शतकी प्रतिहल्ला भारतीयांवर केला आणि भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरवताना आठ चेंडू राखून बाजी मारली. इंग्लंडचा हा भारतावरील सलग आठवा विजय आहे. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर १८० च्या आसपास धावांचाही पाठलाग होऊ शकतो, हे  भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही काही  दिवसांपूर्वी सांगितले होते. त्याचीच प्रचिती इंग्लंडने दिली. स्मृती मानधनाच्या आक्रमक पाऊणशतकामुळे भारताने द्विशतकानजीक मजल मारली, पण डॅनियलने महिला ट्‌वेंटी-२० मध्ये दोन शतके करणारी पहिली खेळाडू होतानाच भारतीय गोलंदाजांना स्थिरावू दिले  नाही. तिने ब्राऊनी स्मिथसह ५.२ षटकांत ६१ आणि टॅमी बेऊमाँट हिच्याबरोबर ९६ धावा जोडत इंग्लंडला विजयी केले. भारताच्या चार गोलंदाजांनी षटकामागे दहापेक्षा जास्त धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडला ट्‌वेंटी-२० इतिहासातील सर्वाधिक धावांचे विजयी लक्ष्य गाठता आले. 

भारत - ४ बाद १९८ (मिथाली राज ५३ - ४३ चेंडूंत ७ चौकार, स्मृती मानधना ७६ - ४० चेंडूंत  १२ चौकार व २ षटकार, हरमनप्रीत कौर ३० - २२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार, पूजा वस्त्राकार २२ - १० चेंडूंत ४ चौकार, तॅश फॅरांट २-३२) पराभूत वि. इंग्लंड ः १८.४ षटकांत ३ बाद १९९ (डॅनियल वॅट १२४ - ६४ चेंडूंत १५ चौकार व ५ षटकार, टॅमी बेऊमाँट ३५ - २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार, झूलन गोस्वामी १-३२, दीप्ती शर्मा २-३६).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news women cricket india vs england T-20