भारताचा बलाढ्य इंग्लंडवर विजय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

लंडन - स्मृती मानधना (९०) आणि पूनम राऊत (८६) यांच्या शानदार शतकी भागीदारीच्या जोरावर उभारलेली भक्कम धावसंख्या आणि सामना अटीतटीचा झाल्यानंतर केलेले सलग तीन धावचीत, यामुळे भारताने यजमान आणि बलाढ्य इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला आणि महिलांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच खळबळ उडवून दिली. 

लंडन - स्मृती मानधना (९०) आणि पूनम राऊत (८६) यांच्या शानदार शतकी भागीदारीच्या जोरावर उभारलेली भक्कम धावसंख्या आणि सामना अटीतटीचा झाल्यानंतर केलेले सलग तीन धावचीत, यामुळे भारताने यजमान आणि बलाढ्य इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला आणि महिलांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीलाच खळबळ उडवून दिली. 

स्मृती आणि राऊत या सलामीवीर शतकापासून वंचित राहिल्या, तरी त्यांनी १४४ धावांची सलामी दिल्यानंतर भारताने २८१ धावा उभारल्या. त्यानंतर इंग्लंडची ५ बाद १५४ अशी अवस्था केली, तेव्हा सामना भारताच्या हातात होता; परंतु फ्रान विल्सन (८१) आणि कॅथरिन ब्रंट (२४) यांनी सामन्यात रंग भरले. एकवेळ अशी होती की, इंग्लंडच्या विजयाची चिन्हे दिसू लागली होती; परंतु भारतीयांनी ब्रंट, विल्सन आणि गून यांना पाठोपाठ धावचीत केले आणि इंग्लंडची ५ बाद २१६ वरून ८ बाद २२९ अशी अवस्था केली आणि सामना आपल्या बाजूने झुकवला. 

या सामन्यात भारतीयांकडून काही झेल सुटले; परंतु क्षेत्ररक्षणात एकूण चार फलंदाजांना धावचीत करण्याची दाखवलेली चपळाई निर्णायक ठरली.
इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी दिल्यावर पहिल्या यशासाठी त्यांना अर्ध्याहून अधिक षटके खर्ची घालावी लागली. पूनम एका बाजूने संयमी फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने स्मृतीने तुफानी हल्ला चढवला.

कॅथरिन ब्रंटच्या एका षटकात तिने चार चौकार मारले. त्यानंतर स्किव्हरवर हल्ला चढवला. पहिल्या दहा षटकांत भारताने ५९ धावा केल्या होत्या.
पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर काही षटके सावध खेळल्यानंतर स्मृतीने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. शंभरपेक्षा अधिक स्ट्राईक रेटने तिने धावा फटकावण्यास सुरवात केली. ७२ चेंडूंतच ९० धावा फटकावल्या. मिताली आणि हर्मनप्रीत कौर यांनी अखेरच्या षटकांत चांगली टोलेबाजी केली. 

संक्षिप्त धावफलक - भारत - ५० षटकांत ३ बाद २८१ (पूनम राऊत ८६ -१३४ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, स्मृती मानधना ९० -७२ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, मिताली राज ७१ -७३ चेंडू, ८ चौकार, हर्मनप्रीत कौर नाबाद २४ -२२ चेंडू, १ चौकार, १ षटकार, हेथर नाईट २-४१) विजयी विरुद्ध इंग्लंड ः ४७.३ षटकांत सर्वबाद २४६ (हेथर नाईट ४६, फ्रान विल्सन ८१ -७५ चेंडू, ६ चौकार, ब्रंट २४ -२४ चेंडू, २ चौकार, शिखा पांडे २-३५, दीप्ती शर्मा ३-४७)

Web Title: sports news women indian cricket team win