श्रीलंकेविरुद्ध झिंबाब्वेची २६५ धावांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कोलंबो - सुरवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीने केलेल्या जिगरबाज खेळीने झिंबाब्वेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेरीस आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या डावात दिवसअखेरीस ६ बाद २५२ धावा करून त्यांनी २६५ धावांची आघाडी मिळवली आहे. 

कोलंबो - सुरवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीने केलेल्या जिगरबाज खेळीने झिंबाब्वेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेरीस आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या डावात दिवसअखेरीस ६ बाद २५२ धावा करून त्यांनी २६५ धावांची आघाडी मिळवली आहे. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा डाव झटपट गुंडाळण्यात यश आल्यानंतरही त्यांची पहिल्या डावातील आघाडी १० धावांवर मर्यादित राहिली होती. त्यानंतर दिवसअखेरीस सुरवातीच्या पडझडीनंतर सिकंदर रझा आणि माल्कम वॉलरच्या शतकी भागीदारीने झिंबाब्वेने सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. खेळ थांबला तेव्हा रझा ९७; तर वॉलर ५७ धावांवर खेळत होता. 
झिंबाब्वेची आघाडी मर्यादित राखल्यावर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात त्यांना अडचणीत आणले. विशेषतः रंगना हेराथच्या फिरकीसमोर झिंबाब्वेची फलंदाजी एकवेळ ४ बाद २३ आणि नंतर ५ बाद ५९ अशी कोलमडली होती; पण त्यानंतर मधल्या फळीत खेळायला आलेल्या सिकंदर रझाने प्रथम पिटर मूरच्या (४०) साथीत सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करून झिंबाब्वेची संभाव्य पडझड रोखली. मूर बाद झाल्यानंतर रझाला माल्कम वॉलरने मोलाची साथ केली. रझाने वॉलरला साथीला घेत सातव्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून झिंबाब्वेच्या डावाला आकार दिला. 
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे ३५६ आणि ६ बाद २५२ (सिकंदर रझा खेळत आहे ९७, माल्कम वॉलर खेळत आहे ५७, रंगाना हेराथ ४-८५) वि. श्रीलंका पहिला डाव ३४६ (उपूल थरंगा ७१, दिनेश चंडिमल ५५, गुणरत्ने ४५, ग्रॅमी क्रिमर ५-१२५).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Zimbabwe's 265-run lead against Sri Lanka