चेंडू कुरतडण्याप्रकरणी दिनेश चंडिमलवर आरोप

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने श्रीलंका कर्णधार दिनेश चंडिमल याच्यावर रविवारी आरोप ठेवला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. 

ग्रोस आयलेट (सेंट ल्युसिया) - चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने श्रीलंका कर्णधार दिनेश चंडिमल याच्यावर रविवारी आरोप ठेवला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. 

पंच अलिम दर आणि इयान गौल्ड यांनी चंडिमल याच्यावर चेंडूची स्थिती बदलण्याबाबत अधिकृत तक्रार केली. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे खेळ दोन तास उशिरा झाला होता. मात्र, आयसीसीने ट्विटरच्या माध्यमातून चंडिमल याच्यावर आज त्याने आचारसंहितेच्या नियम 2.2.9चा भंग केल्याचे स्पष्ट केले. 

आयसीसीने या व्यतिरिक्त चंडिमलच्या कृतीविषयी सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट मंडळाने चंडिमल याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. "श्रीलंकेचा कुठलाही खेळाडू गैरवर्तनात अडकलेला नाही. आमच्या खेळाडूवर हे एकतर्फी आरोप झाले असून, आमच्या खेळाडूची बाजू मांडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. कुठल्याही परिस्थितीत त्याला एकटे सोडणार नाही', असे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे श्रीलंकेच्या खेळाडूंनी चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अशा प्रकरचा ठपका यापूर्वी कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट (2018), दशुन शनाका (2017), फाफ डू प्लेसिस (2016) यांच्यावर आयसीसीने ठेवला होता. शनाकावर यापूर्वी ठपका ठेवण्यात आल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी एखाद्या श्रीलंका खेळाडूवर असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंवर आता बारीक लक्ष राहील अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka Captain Dinesh Chandimal Charged With Changing Condition Of Ball