"पिच फिक्‍सिंग'चे आरोप अविश्‍वसनीय श्रीलंका क्रिकेट मंडळाची माहिती; पोलिसांत तक्रार 

वृत्तसंस्था
Tuesday, 29 May 2018

यापूर्वी पिच फिक्‍सिंग 

- श्रीलंकेतील ग्राऊंड्‌समन, खेळाडू, पंचांवर यापूर्वीही अशा प्रकरणात आरोप 

- गॉलचे माजी ग्राउंड्‌समन जयानंदा वर्णवीरा चौकशीस सहकार्य न केल्यामुळे तीन वर्षांसाठी निलंबित 

​-क्रिकेट भ्रष्टाचारात श्रीलंकेतील कुठल्याही मोठ्या खेळाडूचे नाव नसले तरी, मोठ्या खेळाडूंनी मात्र मॅच आणि स्पॉट फिक्‍सिंगचे आरोप केले आहेत. 

कोलंबो - भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील कसोटी सामन्यात खेळपट्टीचे (पिच) फिक्‍सिंग झाल्याच्या आरोपावर विश्‍वास ठेवणे कठीण असल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. अर्थात, यानंतरही त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी समांतर चौकशीला सुरवात केली आहे. 

"अल जझीरा' या वाहिनीने भारताच्या श्रीलंका दौऱ्यात खेळपट्टीचे फिक्‍सिंग झाल्याचे वृत्त दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हवी तशी खेळपट्टी तयार करण्याबाबत ग्राउंड्‌समन आणि एका खेळाडूत झालेली चर्चा त्यांनी दाखवली. वाहिनीच्या या स्टिंग ऑपरेशननंतर क्रिकेट वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली होती. आयसीसी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहे. 

गॉल मैदानाची खेळपट्टी फिक्‍स होती, यावर विश्‍वास ठेवणे कठीण असल्याचे आमचे मत असले तरी, आयसीसी करत असलेल्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही श्रीलंका क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. 

या चौकशीत केवळ भारतच नव्हे, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामनेही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका क्रिकेट मंडळाने गॉल मैदानाचे ग्राउंड्‌समन थरंगा इंडिका आणि व्यावसायिक क्रिकेटपटू थारिंदू मेंडिस यांना तातडीने निलंबित केले आहे. 

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष मोहन डिसिल्वा यांनी गॉल खेळपट्टीबाबत कर्णधार, पंच आणि निरीक्षक यांच्यापैकी कुणाचीच तक्रार नसताना चौकशी कशासाठी करायची, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. यापैकी एकाच्याही अहवालात गॉलच्या खेळपट्टीबाबत कसल्याही प्रकारचा शेरा आलेला नाही. त्यामुळेच अशा आरोपावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतरही श्रीलंका क्रिकेट मंडळाने पोलिसांकडे तक्रार केली असून, श्रीलंका पोलिसदेखील या प्रकरणाची समांतर चौकशी करत आहेत. 

यापूर्वी पिच फिक्‍सिंग 

- श्रीलंकेतील ग्राऊंड्‌समन, खेळाडू, पंचांवर यापूर्वीही अशा प्रकरणात आरोप 

- गॉलचे माजी ग्राउंड्‌समन जयानंदा वर्णवीरा चौकशीस सहकार्य न केल्यामुळे तीन वर्षांसाठी निलंबित 

-क्रिकेट भ्रष्टाचारात श्रीलंकेतील कुठल्याही मोठ्या खेळाडूचे नाव नसले तरी, मोठ्या खेळाडूंनी मात्र मॅच आणि स्पॉट फिक्‍सिंगचे आरोप केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka says pitch-fixing claims ‘difficult to believe’