पाकमध्ये खेळण्यास श्रीलंका खेळाडूंचा नकार

वृत्तसंस्था
Sunday, 15 October 2017

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुबईमध्ये क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा ट्‌वेन्टी-20 लाहोरमध्ये होणार आहे. श्रीलंका संघात असलेल्या खेळाडूंसह त्यांच्या मंडळाशी करारबद्ध असलेल्या सर्व खेळाडूंनी लाहोरमधील या सामन्यात खेळण्याची असमर्थता पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर मंडळाला ठिकाण बदलण्याची मागणी केली.

कोलंबो : पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि आयसीसी यांनी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा खेळवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी खेळाडूंच्या मनात अजूनही सुरक्षिततेसंदर्भात शंका आहे. म्हणूनच या महिन्याअखेरीस लाहोरमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात खेळण्यास श्रीलंकेच्या 40 करारबद्ध खेळाडूंनी नकार दिला आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुबईमध्ये क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा ट्‌वेन्टी-20 लाहोरमध्ये होणार आहे. श्रीलंका संघात असलेल्या खेळाडूंसह त्यांच्या मंडळाशी करारबद्ध असलेल्या सर्व खेळाडूंनी लाहोरमधील या सामन्यात खेळण्याची असमर्थता पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर मंडळाला ठिकाण बदलण्याची मागणी केली.

2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंका संघाच्या गाडीवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झालेले नाहीत. अपवाद झिंबाब्वेविरुद्धच्या मालिकेचा आणि पाकिस्तान क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्याचा. पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनासाठी आयसीसीने पुढाकार घेत जागतिक मालिकेचे आयोजन केले होते. वर्ल्ड इलेव्हनच्या संघातून काही परदेशी खेळाडू खेळले होते. या मालिकेच्या आयोजनानंतर पाक मंडळाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा ट्‌वेन्टी-20 सामना लाहोरमध्ये आयोजित केला आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे काही पदाधिकारी सध्या दुबईमध्ये खेळत असलेल्या संघातील खेळाडूंशी चर्चा करणार आहेत; तसेच आयसीसीचे पदाधिकारीही त्यांना लाहोरमधील सुरक्षिततेची माहिती देणार असल्याचे समजते. जागतिक सीरिजमध्ये वर्ल्ड इलेव्हन संघातून खेळणाऱ्या श्रीलंकेच्या तिसारा परेराने मात्र त्या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंनी लाहोरमधील सामन्यात न खेळण्याचा आपला निर्णय कायम ठेवला तर श्रीलंका दुय्यम संघ पाठवण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka's cricketers refuse to tour Pakistan