ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना भारतीयाचे मार्गदर्शन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली : भारतीय दौऱ्यामध्ये फिरकी गोलंदाजीचे अस्त्र धारदार व्हावे, यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने एका भारतीयाचीच मदत घेतली आहे. श्रीधरन श्रीराम हे माजी गोलंदाज भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये या गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याच्यावर सोपविण्यात आली आहे. 

फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने चार फिरकी गोलंदाजांना निवडले आहे. चार वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला 0-4 असा 'व्हाईटवॉश' मिळाला होता. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेमध्येही ऑस्ट्रेलियाला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने कसून सराव सुरू केला आहे. 

ऑस्ट्रेलियाचा संघ 29 जानेवारीपासून दुबईमध्ये सराव करणार आहे. या सरावापासून पुढील चार कसोटी सामन्यांपर्यंत श्रीराम संघाबरोबर असतील. ऑस्ट्रेलियाच्या संघात नॅथन लिओन, स्टीव्ह ओकफी, ऍश्‍टन ऍगर, मिशेल स्वेप्सन या चार फिरकी गोलंदाजांसह ग्लेन मॅक्‍सवेल हा अष्टपैलू खेळाडूही आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्यासाठी श्रीराम सल्लागार म्हणून काम करतील. यापूर्वीही श्रीराम यांनी ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह ओकफी या डावखुऱ्या गोलंदाजाला संधी मिळाली आहे. ओकफीला मार्गदर्शन करण्यासाठी माँटी पानेसरची निवड करण्यात आली आहे. 

या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळणार आहे. 

  • पहिली कसोटी : 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी : पुणे 
  • दुसरी कसोटी : 4 मार्च ते 8 मार्च : बंगळूर 
  • तिसरी कसोटी : 16 मार्च ते 20 मार्च : रांची 
  • चौथी कसोटी : 25 मार्च ते 29 मार्च : धरमशाला 
Web Title: Sridharan Shreeram to guide Australian spinners for India Tour