रोहित मुंबई, विराट बंगळूर, तर धोनी चेन्नई संघात कायम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 January 2018

मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले.

मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले.

बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन अपेक्षित होते. त्याच वेळी काहींनी धक्कादायक निर्णय घेतले. कोलकताने कर्णधार गौतम गंभीरला कायम न राखता त्याऐवजी सुनील नारायण आणि आंद्रे रसेल या विंडीज खेळाडूंना पसंती दिली; तर विराट कोहलीच्या बंगळुरूने सर्फराज खानचे रिटेन्शन करीत धक्का दिला. तीन वेळच्या विजेत्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रित बुमरा या तीनही भारतीय खेळाडूंना पसंती दिली. पोलार्ड आणि मलिंगाचा मात्र विचार केला नाही. दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजाला अपेक्षित पसंती दिली. चेन्नईप्रमाणे पुनरागमन करणारे राजस्थान रॉयल्स तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबने अनुक्रमे स्टीव स्मिथ आणि अक्षर पटेल यांना राखले. राजस्थानवर दोन वर्षांची बंदी असल्यामुळे स्मिथ गेल्या दोन वर्षांत पुणे संघातून खेळला होता. आणखी दोन खेळाडूंच्या निवडीचा पर्याय असतानाही राजस्थानने अजिंक्‍य रहाणेचा विचार केला नाही.

बंगळुरूने सर्फराजला दिलेली पसंती त्याच्यासाठी लॉटरीच ठरली. दोन वर्षांपूर्वीही तो बंगळुरू संघात होता; परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे विराट त्याला संघात स्थान देत नव्हता. गतवर्षी दुखापतीमुळे तो खेळला नव्हता. तसेच रणजीमध्ये मुंबईतून एक मोसम खेळल्यानंतर तो गतवर्षी उत्तर प्रदेश संघातून खेळला. यंदाच्या रणजी मोसमात तो खेळलेला नाही.

कायम राहिलेले खेळाडू
चेन्नई - महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा.
दिल्ली - ख्रिस मॉरिस, रिषभ पंत, श्रेयस अय्यर
पंजाब - अक्षर पटेल.
कोलकाता - सुनील नारायण, आंद्र रसेल
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक पंड्या,  बुमराह
राजस्थान - स्टीव स्मिथ
बंगळुरू - विराट कोहली, एबी डिव्हिलर्स, सर्फराज खान
हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्‍वर कुमार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ssports news IPL retention player selection