चेंडू कुरतडण्याची स्मिथ, वॉर्नरची खोड जुनीच!

वृत्तसंस्था
Saturday, 31 March 2018

सिडनी : चेंडू कुरतडल्या प्रकरणात बंदीची शिक्षा भोगावी लागणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांसमोरील अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत 2016 मध्ये सामनाधिकाऱ्यांनी स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही चेंडू कुरतडल्या प्रकरणी समज दिली होती, असे वृत्त स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. 

सिडनी : चेंडू कुरतडल्या प्रकरणात बंदीची शिक्षा भोगावी लागणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांसमोरील अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत 2016 मध्ये सामनाधिकाऱ्यांनी स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही चेंडू कुरतडल्या प्रकरणी समज दिली होती, असे वृत्त स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान कॅमेरुन बॅंक्रॉफ्टने चेंडू कुरतडल्याचे टीव्हीवर दिसले होते. तेव्हापासून बॅंक्रॉफ्ट, स्मिथ आणि वॉर्नर या तिघांवर क्रिकेट विश्‍वातून कठोर शब्दांत टीका सुरू झाली. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने या तिघांवर कारवाई करताना स्मिथ, वॉर्नरवर एका वर्षासाठी; तर बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली. तसेच, वॉर्नरला आता भविष्यात कधीही ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

2016 च्या नोव्हेंबरमध्ये शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील व्हिक्‍टोरियाविरुद्धच्या सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर न्यू साऊथ वेल्सचे प्रतिनिधित्व करत होते. 'या सामन्यामध्ये दोघांचेही वर्तन खिलाडूवृत्तीला साजेसे नव्हते', अशा आशयाचे निरीक्षण त्या सामन्यातील पंच डॅरेल हार्पर यांनी नोंदविले होते. यासंदर्भात त्यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ला ई-मेलही पाठविला होता. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे सामनाधिकारी आणि माजी पंच सायमन टॉफेल यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. 

'त्या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नर यष्टिरक्षकाकडे 'थ्रो' करताना चेंडू मुद्दाम जोरात आपटत होता. चेंडू खराब करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पंचांनी कर्णधार स्मिथला याविषयी माहिती देत असे वर्तन न करण्याच्या सूचना दिल्या. पण स्मिथने त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचाही कर्णधार होता. त्यामुळे चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात गोवला जाऊ नये, यासाठी पंचांनी दुसऱ्या दिवशी न्यू साऊथ वेल्सचे प्रशिक्षक ट्रेंट जॉन्सन यांचीही भेट घेतली होती. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवरही चेंडू कुरतडण्याचे आरोप झाले होते आणि त्याची चौकशी सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर स्मिथ, वॉर्नरची ही कृती सामनाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली', असे हार्पर यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith, David Warner were warned about ball tampering in 2016