निवड समितीसाठी स्टीव्ह वॉ उत्सुक

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथने निवड समितीसमोर स्वत:ची ठाम मते मांडली पाहिजेत. ‘अमूक एक खेळाडू किंवा अशा क्षमतेचा खेळाडू मला संघात हवा आहे‘ हे ठामपणे सांगता यायला हवे. यासाठी त्याने रॉड मार्श आणि इतर सदस्यांशी बोलायला हवे. 
- स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा विश्‍वविजयी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी आता राष्ट्रीय संघाच्या निवड समितीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सध्याचे अध्यक्ष रॉड मार्श चालू मोसमाच्या शेवटी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या पदासाठी वॉ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

यंदाच्या मोसमामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीबाबत सतत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाला मालिका गमवाव्या लागल्या. आता मायदेशातील आगामी मालिकांमध्ये तरी स्टीव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलिया संघ विजयी मालिका कायम राखू शकेल का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 0-5 असा ‘व्हाईट वॉश‘ स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रॉड मार्श यांचा कार्यकाळ वाढविला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आता आगामी मालिकांमध्येही ऑस्ट्रेलियाची कामगिरी खालावली, तर मार्श यांच्यासमवेत आणखीही काही जणांचा बळी जाऊ शकतो. 

स्टीव्ह वॉ यांचे बंधू मार्क वॉ 2014 पासून ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे सदस्य आहेत. ‘यासंदर्भात एखादी संधी आली, तर मी नक्कीच विचार करेन. पण ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे का हा प्रश्‍न आहेच आणि इतर सर्व गोष्टीही जुळून येणेही महत्त्वाचे आहे,‘ असे वक्तव्य वॉ यांनी ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड‘ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले. 

कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथने निवड समितीसमोर स्वत:ची ठाम मते मांडली पाहिजेत. ‘अमूक एक खेळाडू किंवा अशा क्षमतेचा खेळाडू मला संघात हवा आहे‘ हे ठामपणे सांगता यायला हवे. यासाठी त्याने रॉड मार्श आणि इतर सदस्यांशी बोलायला हवे. 
- स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार

Web Title: Steve Waugh ready for Australian National Selector's job