पराभवानंतर स्मिथने मागितली माफी

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

आमच्यासाठी ही मालिका चांगली होती. भारतीय संघाला त्यांच्या यशाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांचा संघ चांगला होता. आम्हाला प्रत्येक क्षणी शिकायला मिळाले.

धरमशाला - रवींद्र जडेजा आणि मॅथ्यू वेड यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर अपलोड केल्याने नाराज असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने म्हटले आहे. तसेच त्याने या मालिकेत भावनांवर आवर घालण्यास असमर्थ ठरल्याने माफीही मागितली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा आज (मंगळवार) अखेर झाला. चौथ्या कसोटी भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-1 असा विजय मिळविला. मालिकेदरम्यान अनेकवेळी दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंमध्ये वाद पहायला मिळाले. स्मिथचा डीआरएसबाबतचा वाद हा सर्वाधिक चर्चेत राहिला.

स्मिथ म्हणाला, की आमच्यासाठी ही मालिका चांगली होती. भारतीय संघाला त्यांच्या यशाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांचा संघ चांगला होता. आम्हाला प्रत्येक क्षणी शिकायला मिळाले. हेझलवूडचा झेल पकडल्याचा दावा करणाऱ्या मुरली विजयबाबत अपशब्द वापरल्याने मी माफी मागतो. मात्र, मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड आणि जडेजा यांच्यातील वादाचा व्हिडिओ बीसीसीआयने अपलोड केल्याने मी नाराज आहे.

Web Title: steven smith apologises india vs australia virat kohli sledging