अशा खेळपट्ट्यांवर कौशल्याची कसोटी लागते

पीटीआय
शनिवार, 28 जानेवारी 2017

आधी कोलकता, आता कानपूरच्या खेळपट्टीचे कर्णधार कोहलीकडून समर्थन
कानपूर - इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली असली, तरी अखेरच्या सामन्यातील ईडन गार्डन आणि टी-20 च्या पहिल्या सामन्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानाच्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांच्या तंत्राची कसोटी पाहिली आणि कर्णधार विराट कोहलीनेदेखील ते मान्य करताना अशा खेळपट्ट्यांवर अधिक चांगला सराव मिळतो, असे मत व्यक्त केले.

आधी कोलकता, आता कानपूरच्या खेळपट्टीचे कर्णधार कोहलीकडून समर्थन
कानपूर - इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली असली, तरी अखेरच्या सामन्यातील ईडन गार्डन आणि टी-20 च्या पहिल्या सामन्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानाच्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांच्या तंत्राची कसोटी पाहिली आणि कर्णधार विराट कोहलीनेदेखील ते मान्य करताना अशा खेळपट्ट्यांवर अधिक चांगला सराव मिळतो, असे मत व्यक्त केले.

ईडन गार्डनच्या उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज बॅकफूटवर राहिले. तीच गत गुरुवारी कानपूरच्या ग्रीन पार्कवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात झाली. भारताच्या फलंदाजांचे तंत्र काही अंशी उघडे पडले आणि पहिला टी-20 सामनाही भारताने गमावला.

कोहली म्हणाला, 'माझ्या डोक्‍यात आतापासूनच चॅंपियन्स करंडक स्पर्धेचे विचार घोळू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कोलकतील खेळपट्टी आव्हानात्मक होती. कानपूरलाही अशी काहिशी खेळपट्टी आम्हाला मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे राहण्यासाठी अशा खेळपट्ट्यांवर खेळल्याने अधिक चांगला सराव मिळतो. तुमच्या फलंदाजीचे कौशल्य तपासण्याची हीच एक संधी असते.''

युजवेंद्रच्या निवडीचे समर्थन
अश्‍विन, जडेजा संघात नसताना अनुभवी अमित मिश्राच्या ऐवजी युजवेंद्र चहलला खेळविण्याचे कोहलीने समर्थन केले. तो म्हणाला, ""टी-20 सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. 2014 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतही तो चांगला खेळला होता. 2016 च्या स्पर्धेसाठी तो संघात नव्हता याचे आम्हालाच आश्‍चर्य वाटले. त्याच्याकडे कमालीची विविधता आहे. कुठल्याही खेळपट्टीवर तो उपयुक्त ठरू शकतो.''

सलामीत सातत्य हवे
सलामीच्या जोडीकडून सातत्य हवे, असे सांगून कोहलीने आपल्या सलामीला येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, 'नक्कीच, सलामीच्या जोडीत आम्हाला सुधारणा आवश्‍यक आहे. सलामीच्या जोडीने धावा कराव्यात, असे प्रत्येक संघाला वाटत असते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकू शकतील असे सलामीचे फलंदाज प्रत्येक वेळेस सापडतीलच असे नाही. त्यामुळे आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. राहुल, धवन यांना आम्ही अजूनही पाठिंबा देऊच. त्यांनी यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यात विश्‍वास निर्माण होण्यासाठी आम्ही एकावर विसंबून राहून दुसऱ्या बाजूने नव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळेच रोहित शर्मा नसताना मी सलामीला खेळण्याचा निर्णय घेतला.''

इंग्लंडने चांगलाच खेळ केला. मुख्य म्हणजे ते मुक्तपणे खेळले. झटपट क्रिकेटला साजेशी अशीच त्यांची देहबोली होती. ती बघता आम्हाला 30 ते 35 धावा कमी पडल्या.
- विराट कोहली, भारताचा कर्णधार

संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकांत 7 बाद 147 (महेंद्रसिंह धोनी नाबाद 36-27 चेंडू, 3 चौकार, सुरेश रैना 34 -23 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, विराट कोहली 29, मोईन अली 2-21) पराभूत वि. इंग्लंड 18.1 षटकांत 3 बाद 148 (ज्यो रुट नाबाद 46 46 चेंडू, 4 चौकार, इयॉन मॉर्गन 51 38 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, सॅम बिलिंग्ज 22, जेसन रॉय 19, युजवेंद्र चहल 2-27).

Web Title: Such pitches have the skills test