इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी 

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

भारताने आयर्लंडचा उडवलेला धुव्वा यातून नवोदित कसोटी संघ आणि प्रस्थापित संघ यामध्ये किती मोठी दरी आहे हे सिद्ध झाले. आयर्लंडचे बहुतेक खेळाडू इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत असतात; परंतु 1970 च्या दशकात त्यांच्या असलेल्या क्षमतेच्या जवळपासही सध्याचा संघ नसल्याचे दिसून येते. केवळ दोन ट्‌वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेऐवजी त्यांना अधिक सामने खेळायला संधी देणे आवश्‍यक आहे. 

इंग्लंडचा संघ मात्र निश्‍चितच वेगळा आणि बलाढ्य आहे. त्यांच्या खेळाडूंना ट्‌वेन्टी-20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड उपविजेते होते हे विसरून चालणार नाही. केवळ कार्लोस ब्रेथवेटने सलग चार षटकार मारल्यामुळे इंग्लंडच्या हातून विजेतेपद निसटले होते. 

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे बुमरा या ट्‌वेन्टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमार ही जोडी चांगलीच जमलेली आहे. डावाची सुरवात आणि सांगता ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. आयपीएल आणि आता आयर्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे बुमराऐवजी उमेश यादवला संधी मिळू शकेल. यजुर्वेंदर चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी पुन्हा एकदा महत्त्वाची ठरू शकेल. इंग्लंडच्या मधल्या फळीला रोखण्याची क्षमता त्यांच्यावर असेल. 

फलंदाजी ही भारताची ताकद आहे. धवन, रोहित, राहुल यांनी कोहलीवरचा ताण कमी केला आहे. डावखुरा रैना मधल्या फळीत विविधता आणू शकतो. धोनी आणि पंड्या यांनी आयर्लंडविरुद्ध षटकार ठोकून बॅट परजल्या आहेत. एकूणच मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भारतीयांचा प्रयत्न असेल. झेल पकडण्यात होणाऱ्या चुका हे भारतासाठी चिंता करणारे आहे. यामध्ये सुधारणा केली तर भारताच्या क्रिकेट इतिहासात इंग्लंडचा हा दौरा ऐतिहासिक ठरू शकेल. (पीएमजी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil gavaskar write about england tour