सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय की सूर्यास्त?

सुनिल गावस्कर
Friday, 25 May 2018

राजस्थान रॉयल्सने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि यंदाच्या आयपीएल प्लेऑफमधून त्यांना बाद व्हावे लागले. कोलकतातील सामन्यात त्यांना अचूक संघ निवड करता आली नाही. ज्योस बटलर आणि स्टोक्‍स यांच्या तोडीचा पर्याय मिळणे कठीण होते.

राजस्थान रॉयल्सने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि यंदाच्या आयपीएल प्लेऑफमधून त्यांना बाद व्हावे लागले. कोलकतातील सामन्यात त्यांना अचूक संघ निवड करता आली नाही. ज्योस बटलर आणि स्टोक्‍स यांच्या तोडीचा पर्याय मिळणे कठीण होते. त्यामुळे त्यांचा संघ कमकुवत झाला. क्‍लासेनच्या गुणवत्तेबाबत शंका नाही; परंतु तो चौथ्या क्रमांकाचा किंवा त्यानंतरच्या क्रमांकासाठी रॉजर बिन्नी हे योग्य पर्याय नाहीत. सहा किंवा सातव्या क्रमांकासाठी ते योग्य आहेत. कालच्या सामन्यात अजिंक्‍य रहाणे बाद झाला आणि त्यानंतरच्या पाच षटकांत राजस्थानला अवघ्या 25 धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकताला विजयाची संधी मिळत गेली. त्यांचे फिरकी गोलंदाज विशेष करून कुलदीप यादवने अचूक मारा केला. शेवटी 30 धावांचा पडलेला फरक राजस्थानच्या मुळावर आला. 

जे खेळाडू पूर्ण मोसमासाठी उपलब्ध असणार आहेत, अशा खेळाडूंना संघात स्थान देण्यास प्राधान्य देण्याचा विचार करण्याची वेळ फ्रॅंचाईजीवर आली आहे. बटलर आणि स्टोक्‍स प्लेऑफसाठी उपलब्ध नसणार याची राजस्थानला जाणीव होती. त्यामुळे त्यांनी गटातील साखळी सामन्यांसाठी त्यांचा वापर केला; परिणामी इतरांना कमी संधी मिळाली. लिलावापूर्वी जर वेळापत्रक जाहीर झाले तर संघमालकांना खेळाडू निवडणे सोपे जाईल. 

या सामन्यात कोलकताने कर्णधाराच्या जबरदस्त योगदानामुळे शानदार विजय मिळवला. त्यांचा कर्णधार अखेरच्या क्षणापर्यंत कधीही हार मानत नाही. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर त्याने संघाला स्थैर्य दिले आणि त्यानंतर आंद्रे रसेलने स्फोटक फलंदाजी केली. त्यामुळे कोलकताला अपेक्षेपेक्षा अधिक 15 धावा करता आल्या. 

विजयाची संधी असूनही सलग चार सामने गमावले असल्याने हैदराबादला आता क्‍लॉलीफायरच्या दुसऱ्या सामन्यात मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाचे दरवाजे उघडलेल्या सिद्धार्थ कौलने अखेरच्या सामन्यात अधिक धावा दिल्या. रशिद खान आणि विलिमसन हे अपयशी ठरले, तर हैदराबादचा सूर्य लवकर मावळतो, हे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारच्या सामन्यासाठी लय कोलकता संघाकडे आहे आणि प्रेक्षकांचा पाठिंबाही त्यांना आहे. हैदराबादकडे अजूनही विजयाची ताकद आहे की त्यांच्या आव्हानातील हवा निघून गेली आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunrisers hyderabad in or out