रैनाचे पुनरागमन; जडेजा, आश्‍विनला विश्रांती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

जडेजा, आश्‍विन, शमी यांना विश्रांती दिल्यानंतर या संघात बहुतांश तरुण खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे भरवशाचा फलंदाज आणि वेळप्रसंगी गोलंदाजीही करू शकणारा एखादा अनुभवी खेळाडू संघात हवा होता. त्यासाठी सुरेश रैना हा उपयुक्त खेळाडू आहे. 
- एम. एस. के. प्रसाद, निवड समितीचे अध्यक्ष 

नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाचे जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा काल (गुरुवार) झाली. 

जूनमध्ये झालेल्या झिंबाब्वे दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे आणि अमित मिश्रा यांना विश्रांती देण्यात आली होती. या चौघांचेही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुनरागमन झाले आहे. तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा आणि महंमद शमी यांना एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात भारतीय संघ मायदेशात 11 कसोटी खेळणार आहे. हे भविष्यातील सामने लक्षात घेत आश्‍विन, जडेजा आणि शमीला पहिल्या तीन सामन्यांत विश्रांती दिली गेली आहे. कसोटी मालिकेमध्ये शिखर धवन, के. एल. राहुल आणि भुवनेश्‍वर कुमार हे तिघे जखमी झाले होते. या तिघांनाही एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. 

गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या मालिकेनंतर सुरेश रैनाला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. झिंबाब्वे दौऱ्यासाठीही रैनाला वगळण्यात आले होते. त्यानंतर दुलीप करंडक स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे, स्टुअर्ट बिन्नीऐवजी हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड समितीने पसंती दिली. 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ : 
रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, मनदीपसिंग, अमित मिश्रा, अक्षर पटेल, केदार जाधव, जसप्रित बुमराह, जयंत यादव, उमेश यादव, धवल कुलकर्णी, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक)

Web Title: Suresh Raina returns to Team India; R Ashwin, Ravindra Jadeja rested