आता टी-20चा थरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कानपूरमध्ये आज रंगणार पहिला सामना
कानपूर - चौकार व षटकारांची आतषबाजी झालेल्या वन-डे क्रिकेट मालिकेनंतर आता भारत-इंग्लंड यांच्यात टी-20चा थरार रंगणार आहे. यातील पहिला सामना उद्या कानपूरमध्ये होत आहे. हा प्रकार मुळातच हाणामारीचा असल्यामुळे गोलंदाजांची पुन्हा परवड होण्याची शक्‍यता आहे.

कानपूरमध्ये आज रंगणार पहिला सामना
कानपूर - चौकार व षटकारांची आतषबाजी झालेल्या वन-डे क्रिकेट मालिकेनंतर आता भारत-इंग्लंड यांच्यात टी-20चा थरार रंगणार आहे. यातील पहिला सामना उद्या कानपूरमध्ये होत आहे. हा प्रकार मुळातच हाणामारीचा असल्यामुळे गोलंदाजांची पुन्हा परवड होण्याची शक्‍यता आहे.

नजीकच्या काळात कोणतीही आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धा अथवा दोन देशांमधली मालिका होणार नसल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. एकदिवसीय मालिकेत खेळलेले सहा खेळाडू या मालिकेत नसतील. त्यामुळे रिषभ पंतसारख्या नवोदितांबरोबर सुरेश रैना, आशिष नेहरा यांसारख्या सिनियर्सनाही अनुक्रमे गुणवत्ता आणि उपयुक्तता दाखवण्याची संधी मिळणार आहे.

या मालिकेद्वारे निवड समितीने जास्तीत जास्त खेळाडूंना संधी उपलब्ध केली आहे. आर. अश्‍विन व रवींद्र जडेजा यांना अखेरच्या क्षणी विश्रांती देऊन परवेझ रसूल व यजुवेंद्र चाहल यांची निवड केली. हे गोलंदाजही संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास उत्सुक असतील. पण चौकार व षटकारांच्या आतषबाजीत मात्र त्यांना सावध राहावे लागणार आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून चर्चेत आलेला 19 वर्षीय रिषभ पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गतवर्षी झालेल्या 19 वर्षीय विश्‍वकरंडक स्पर्धेतून त्याने आपली गुणवत्ता दाखवली होती. तसेच रणजी क्रिकेटमध्ये त्रिशतक करून सर्वांचे लक्ष वेधले होते. धोनी संघात असल्यामुळे त्याला यष्टिरक्षणाची संधी मिळण्याची शक्‍यता कमी असली, तरी सलामीचा फलंदाज म्हणून त्याचा विचार होऊ शकतो. शिखर धवनला या संघात स्थान नसल्यामुळे तो के. एल. राहुलचा सलामीचा साथीदार असू शकेल. परंतु, आयपीएलमध्ये विराट कोहली सलामीला खेळत असल्यामुळे तो या मालिकेत कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

भारताची मधली फळी अनुभवी खेळाडूंची असेल. विराट कोहली, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी व सुरेश रैना असे ताकदवान फलंदाज असतील. सुरेश रैनासाठी निवड समितीचे लक्ष वेधण्याची ही मोठी संधी असेल. त्याने एकदिवसीय संघातलेही स्थान गमावले आहे; तर केदार जाधवने आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स स्पर्धेपूर्वी फॉर्म आणि उपयुक्तता दाखवण्यासाठी घरच्या मैदानाशिवाय रैनाला दुसरे चांगले मैदान नसेल.

आयपीएल फ्रॅंचाईजचे लक्ष
या मालिकेतून टी-20चा पुढचा संघ निवडायचा नसल्यामुळे निवड समितीला फार मोठे काम नसेल; परंतु आयपीएल फ्रॅंचाईजचे प्रामुख्याने इंग्लिश खेळाडूंवर लक्ष असेल. मॉर्गनसारखे एक-दोन खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत; परंतु ख्रिस वोक्‍स, बेन स्ट्रोक्‍स, जेनस रॉय, प्लंकेट यांसारख्या खेळाडूंवर आयपीएल फ्रॅंचाईज लक्ष ठेवून असतील.

भारत दौऱ्यात पाचपैकी चार कसोटी सामने गमावणाऱ्या इंग्लंडने तीनपैकी पहिले दोन एकदिवसीय सामनेही गमावले होते. कोलकत्यातला सामना अखेरच्या चेंडूवर का होईना; पण जिंकून त्यांनी दौऱ्यातील पहिला विजय मिळवला होता. बदललेल्या दैवाचा फायदा घेऊन ट्‌वेन्टी-20 मालिका तरी जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

ठिकाण - ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर
वेळ - दुपारी 4.30 पासून.
प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस

Web Title: t-20 cricket match india & england