मेंदू बधिर झालेल्या स्मिथची दखल घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित

'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित
बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा प्रयत्नही त्याला भोवण्याची शक्‍यता आहे. "बीसीसीआय'ने यजमान कर्णधार विराट कोहलीला पाठिंबा देताना नेमका हाच मुद्दा उचलून धरला आहे. "आयसीसी'ने स्मिथच्या या वक्तव्याची दखल घ्यावी, अशी मागणी "बीसीसीआय'ने केली आहे. यामुळे या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांना 48 तासांत निर्णय घ्यावा लागेल.

"बीसीसीआय'ने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, आवश्‍यक तेवढी चर्चा केल्यानंतर तसेच "व्हिडिओ रिप्ले' पाहिल्यानंतर आम्ही भारतीय संघ तसेच कर्णधार विराटला ठाम पाठिंबा देत आहोत. त्याने केलेल्या कृतीस आयसीसीच्या एलिट पॅनेलवरील पंच नायजेल लॉंग यांनी पाठिंबा दिला. ते तातडीने स्मिथपाशी गेले आणि अवैध मार्गाने मदत घेण्यासाठी कृती करण्यापासून त्याला रोखले. स्मिथने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची आयसीसीने दखल घ्यावी. उर्वरित कसोटी क्रिकेटच्या खऱ्या तत्त्वानुसार खेळल्या जातील अशी आमची प्रामाणिक आशा आहे.

ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने (क्रिकेट ऑस्ट्रेलिया-"सीए') सुद्धा स्मिथला पाठिंबा दिला. स्मिथने फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे विराटने पत्रकार परिषदेत सूचित केले होते. "सीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलॅंड यांनी सांगितले की, स्मिथ, ऑस्ट्रेलियन संघ आणि आमच्या ड्रेसिंग रूमच्या निष्ठेविषयी शंका उपस्थित करणारे आरोप अपमानास्पद आहेत. स्टीवच्या कृतीमध्ये कोणताही वाईट उद्देश नव्हता अशी आमची ठाम धारणा आहे. आमच्या निष्ठेला धक्का बसला किंवा आम्ही अवैध डावपेचांचा वापर केला असे सूचित करणारे कोणतेही वक्तव्य आम्ही नाकारतो. स्टीव आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अभिमानाने देशाचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.'

लिमनसुद्धा पाठीशी
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लिमन यांनी दौऱ्यावर आलेल्या त्यांच्या देशाच्या पत्रकारांशी बोलताना विराटच्या आरोपांचे खंडन केले. स्मिथला पाठिंबा देताना ते म्हणाले की, "मला हे ऐकून फार आश्‍चर्य वाटले. ते त्याचे मत आहे आणि आमचेसुद्धा काही मत आहे. शेवटी आम्ही योग्य पद्धतीने सामना खेळतो. आम्ही खेळण्याची पद्धत बदलली, आम्ही संघात बदल केले. आमचा संघ तरुण आहे. त्यांनी आता केलेल्या खेळाविषयी मी फार आनंदी आहे. आम्ही असे काही (फसवणूक) कधीही केली नाही. आम्ही केवळ पुढील सामना खेळण्यावर लक्ष केंद्रित करू.'

हॅंडसकॉम्बची कबुली
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी "डीआरएस'चे अपील करण्याविषयी डग-आउटमधील सहकाऱ्यांकडून कौल घ्यावा असा सल्ला कर्णधार स्टीव स्मिथला दिल्याचे पीटर हॅंडसकॉम्बने मान्य केले, मात्र नियमच माहीत नव्हता असा दावाही त्याने केला. यामुळे तो सारवासारव करीत असल्याचे स्पष्ट झाले. मुख्य म्हणजे कसोटी संपल्यानंतर पत्रकार परिषदेत विराट कोहलीने जोरदार टीका केल्यानंतर मध्यरात्री हॅंडसकॉम्बने ट्‌विट केले. "स्मगा'ने (स्मिथचे टोपणनाव) आमच्या बॉक्‍सकडे (डग-आउट किंवा पॅव्हेलियन) पाहावे असे मी सुचविले. माझी चूक झाली, मला नियमांची कल्पना नव्हती. अर्थात ही कसोटी अनोखी झाली आणि त्यावर कशाचाही परिणाम होऊ नये, असे ट्‌विट त्याने केले आहे.

क्‍लार्ककडून घरचा आहेर
उमेश यादवच्या चेंडूवर पंचांनी पायचीत ठरविताच स्मिथने आधी हॅंडसकॉम्बकडे पाहिले. हॅंडसकॉम्ब तेव्हा नॉन-स्ट्रायकर होता. त्यानेच हे सूचित केल्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क यांनी समालोचनाच्या वेळी सांगितले. त्याचवेळी त्यांनी परखडपणे सांगितले की, "डीआरएस' पद्धतीचा अशा प्रकारे वापर करणार आहात का हे मला ऑस्ट्रेलियन संघाकडून जाणून घ्यायचे आहे. ते तसे करणार असतील तर ते मान्य होणार नाही. फुटेज पाहिल्यानंतर जे काही घडले ते काळजी करण्यासारखे आहे. स्मिथने मागे वळून पाहावे आणि सपोर्ट स्टाफ काय म्हणते त्याचा अंदाज घ्यावा, असेच हॅंडसकॉम्ब सुचवीत होता.

स्मिथला धडा - स्टीव वॉ
दरम्यान, उभय संघांच्या माजी खेळाडूंनीही या वादात उडी घेतली आहे. माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी स्मिथचे समर्थन केले, पण त्याला धडा मिळाला असेल असेही ते म्हणाले. एका खासगी कार्यक्रमाच्या वेळी ते म्हणाले की, "ही कसोटी अप्रतिम झाली. आपण मात्र एकाच प्रसंगावर भर देणे लाजिरवाणे आहे. वरकरणी पाहता स्मिथ जे काही म्हणाला त्यावर मी विश्‍वास ठेवेन. पंचांनी वेळीच हालचाल करून त्याला रोखले हे चांगले झाले. याचा पुन्हा विचार करताना स्मिथला लाज वाटेल. त्याला नक्कीच धडा मिळाला असेल.' आयसीसीमधील कुणीतरी हस्तक्षेप करून या प्रकरणाला पूर्णविराम द्यावा, कारण मालिका पुढे नेणे आवश्‍यक आहे. कदाचित स्मिथला ताकीद दिली जाईल. कसोटी तीव्र चुरशीची झाली, असेही वॉ यांनी नमूद केले.

गांगुलीची टीका
भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी स्मिथवर टीका केली. ते म्हणाले की, असे घडू नये म्हणून पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे.

विराट हा परिपक्व आणि अनुभवी क्रिकेटपटू आहे. मैदानावरील त्याचे वर्तन अनुकरणीय असेच आहे.
- बीसीसीआय

स्टीव हा एक अप्रतिम क्रिकेटपटू तसेच माणूस आहे. अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श आहे.
"क्रिकेट ऑस्ट्रेलिया'

'कोड वर्ड' - टी!
बुधवारी संघाचे वास्तव्य असलेल्या रिटझ्‌ कार्लंटन हॉटेलात जाऊन काही जणांची भेट घेतली असता असे समजले की भारतीय संघ पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना मिचेल मार्श बाद झाला त्या क्षणी पायचीतचे अपील झाले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियन पॅव्हेलीयनमधून "टी' आकाराची खूण करून डीआरएसची दाद माग असा सल्ला दिला जात होता. जागरूक विराटने ते हातवारे पंच लॉंग यांच्या निदर्शनास लगेच आणून दिले होते.

दहा लाख डॉलरचा जॅकपॉट नक्की
दुसरी कसोटी जिंकल्यामुळे भारताचा दहा लाख डॉलरचा जॅकपॉट नक्की झाला. एक एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या आयसीसी जागतिक क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान नक्की असेल. या बक्षिसासाठी ही निर्धारित मुदत होती. भारताला हरविण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ही मालिका किमान 3-0 फरकाने जिंकणे अनिवार्य होते, पण एक कसोटी जिंकून भारताने अव्वल स्थानासह जॅकपॉटवर शिक्कामोर्तब केले.

बंगळूनंतर "ब्रेक'
तिसरी कसोटी 16 मार्चपासून रांचीमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे बंगळूरच्या कसोटीनंतर दोन्ही संघांनी ब्रेक घेतला आहे. ऑसी संघाला चार दिवसांची सुटी देण्यात आली असून काही खेळाडू थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत तर काही गोव्याला रवाना झाल्याचे समजले. बीसीसीआयचा वार्षिक बक्षीस समारंभ बुधवारी रात्री होणार असल्याने भारतीय संघातील सर्व खेळाडू समारंभाला हजर राहून गुरुवारी आपापल्या घरी जाणार असल्याचे समजले.

Web Title: Take note of the brain of a deaf Smith