मालिका विजयाचेच भारतीय संघाचे उद्दिष्ट 

पीटीआय
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कटक - कसोटी मालिकेपासूनच भारतीय फलंदाजीचा आणि फिरकीचा धसका घेतलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाला आता या दडपणातून बाहेर पडून आव्हान टिकविण्यासाठी धडपडावे लागेल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या येथील बाराबत्ती स्टेडियमवर होईल. तेव्हा भारतीय संघ मालिका विजयाचे, तर इंग्लंड आव्हान राखण्याच्या दडपणातून बाहेर पडण्याचे उद्दिष्ट राखून असेल. 

कटक - कसोटी मालिकेपासूनच भारतीय फलंदाजीचा आणि फिरकीचा धसका घेतलेल्या पाहुण्या इंग्लंड संघाला आता या दडपणातून बाहेर पडून आव्हान टिकविण्यासाठी धडपडावे लागेल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या येथील बाराबत्ती स्टेडियमवर होईल. तेव्हा भारतीय संघ मालिका विजयाचे, तर इंग्लंड आव्हान राखण्याच्या दडपणातून बाहेर पडण्याचे उद्दिष्ट राखून असेल. 

भारतीय भूमीत पाय ठेवल्यापासून इंग्लंडने कसोटी सामन्यात 537, 400, 477 अशा धावा केल्या, पण ते भारताला पराभूत करू शकले नाहीत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुणे येथे त्यांनी 350 धावा केल्या. भारतीय संघाला 4 बाद 63 असे अडचणीत आणले, तरीदेखील ते विजयाला गवसणी घालू शकले नाहीत. विराट कोहली आणि केदार जाधव यांनी त्यांच्या घशातून विजयाचा घास काढून घेतला. 

विराट कोहली आणि फिरकी गोलंदाज असा अभ्यास करून इंग्लंड मैदानावर उतरत असले, तरी आता त्यांना केवळ एकट्या विराटचा विचार करून चालणार नाही. केदारने भारतीय संघाची नुसती ताकदच नाही, तर खोलीदेखील दाखवून दिली आहे. 

तांत्रिक कारणांमुळे दोन्ही संघ आजच सकाळी पुण्यातून येथे दाखल झाले. सराव हा ओघाने आला असला, तरी इंग्लंडला आपल्या नियोजनाचा फेरविचार करावा लागणार आहे. त्यांना एकट्या विराटचा नाही, तर आता संपूर्ण भारत संघाचा विचार करावा लागेल. त्यातच येथे संध्याकाळी 5.30 पासून दव पडत असल्यामुळे या आव्हानाचा विचारही दोन्ही संघांना आपल्या नियोजनात करावा लागेल. पहिला डाव संपताना दव पडायला सुरवात होईल. तसेच दुसऱ्या डावात सुरवातीपासून दव पडलेले असेल, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणेच कुणीही पसंत करेल. या मैदानावर 2014 मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळविला गेला, तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 363 धावांची मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेला 169 धावांत गुंडाळले होते. 

धवन की रहाणे 
भारतीय संघात बदल अपेक्षित नसले, तरी संघ व्यवस्थापनाला शिखर धवनच्या अपयशाचा विचार करावाच लागेल. सराव सामन्यात 91 धावांची खेळी करणाऱ्या रहाणेला संधी देण्याचा विचार करताना धवनला बाहेर बसावे लागण्याची शक्‍यता आहे. युवराजही अपयशी ठरला असला, तरी तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने त्याला आणखी एक संधी मिळू शकते. गोलंदाजीत पहिल्या सामन्यात 63 धावा देणाऱ्या उमेश यादवला वगळले जाऊ शकते. त्याची जागा भुवनेश्‍वरकुमार घेईल. 

गोलंदाजीत सुधारणा आवश्‍यक 
इंग्लंड संघ फलंदाजीच्या आघाडीवर कसोटी मालिकेपासून खरा उतरला आहे; पण, गोलंदाजीतील अपयशाने त्यांची पाठ सोडलेली नाही. प्रतिस्पर्धी संघाचे दहा गडी बाद करण्याची दहशत त्यांच्या गोलंदाजांत नाही. आदिल रशिद हा फिरकी गोलंदाज पहिल्या सामन्यात अगदीच फिका पडला. त्यामुळे लियाम डावसनला संधी मिळू शकते. फलंदाजीत ऍलेक्‍स हेल्सला सूर गवसणे अपेक्षित आहे. 

पहिल्या सामन्यात आम्ही विराटला लक्ष्य केले होते. पण, केदार असा काही खेळ करेल असे वाटले नव्हते. आता आम्हाला दुसरे नियोजन करावे लागेल. 
इयॉन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

Web Title: The team aims to win the series