पार्थिवला वगळले; साहाचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी अभिनव मुकुंदची निवड

नवी दिल्ली - बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे पार्थिव पटेलने वृद्धिमन साहासाठी यष्टिरक्षकाची जागा खाली केली आहे. त्याच वेळी सलामीसाठी पर्याय म्हणून तमिळनाडूच्या अभिनव मुकुंदला सहा वर्षानंतर पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी अभिनव मुकुंदची निवड

नवी दिल्ली - बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून अपेक्षेप्रमाणे पार्थिव पटेलने वृद्धिमन साहासाठी यष्टिरक्षकाची जागा खाली केली आहे. त्याच वेळी सलामीसाठी पर्याय म्हणून तमिळनाडूच्या अभिनव मुकुंदला सहा वर्षानंतर पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

बांगलादेशविरुद्धचा हा कसोटी सामना हैदराबाद येथे ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान होईल. प्रमुख यष्टिरक्षक साहाला दुखापत झाल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत खेळू शकला नव्हता त्याच्याऐवजी संधी देण्यात आलेल्या पार्थिव पटेलने संघाच्या गरजेनुसार सलामीलाही फलंदाजी केली होती, परंतु आता साहा तंदुरुस्त झाल्यामुळे पार्थिवला वगळून त्याला संधी देण्यात आली आहे.

पार्थिवनेही चांगली कामगिरी केली असल्यामुळे त्याचे स्थान कायम राहील अशी चर्चा होती; परंतु एकच सामना असल्यामुळे पार्थिवला वगळण्यात आले. 

सलामीसाठी केएल राहुल आणि मुरली विजय हे दोन फलंदाज असताना अभिनव मुकुंदला पुनरागमनाची दिलेली संधी काहीशी अनपेक्षित ठरली आहे. रणजी स्पर्धेत त्याने १४ सामन्यांत ६५.३० च्या सरासरीने चार शतके आणि तीन अर्धशतकांसह ८४९ धावा केल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या इराणी सामन्यात शेष भारत संघातून तो अपयशी ठरला होता. यंदाच्या रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळचा मात्र विचार करण्यात आला नाही. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारत अ संघातून स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघाचा हा सामना मुंबईत १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. हार्दिक पंड्या या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या या कसोटी सामन्यासाठी अश्‍विन, जडेजा, जयंत यादव आणि अमित मिश्रा असे चार फिरकी गोलंदाज १६ जणांच्या संघात निवडले आहेत. उमेश यदाव, इशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार आणि हार्दिक पंड्या असे चार वेगवान गोलंदाज असतील, महंमद शमीचा दुखापतीमुळे विचार करण्यात आला नाही.

संघ - विराट कोहली, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, करुण नायर, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पंड्या.

सराव सामन्यासाठी भारत अ संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), अखिल हेरवाडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, इशांत किशान, शहबाज नदीम, कृष्णाप्पा गौथम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक दिंडा, महंमद सिराज, राहुल सिंग आणि बाबा अपराजित.

Web Title: team selection for test cricket match