भारत दौऱ्यावरील संघ अफगाणिस्तानशी खेळणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

भारतीय दौऱ्यावर येणारा प्रत्येक पाहुण्या संघास आता अफगाणिस्तानशी एक सराव सामना खेळावा लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनीच ही माहिती दिली. 

काबूल (अफगाणिस्तान) - भारतीय दौऱ्यावर येणारा प्रत्येक पाहुण्या संघास आता अफगाणिस्तानशी एक सराव सामना खेळावा लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनीच ही माहिती दिली. 

"बीसीसीआय'चे एक शिष्टमंडळ सध्या अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर चौधरी यांनीच ही माहिती दिली. या बैठकीत दोन देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यावरदेखील चर्चा झाली. अफगाणिस्तान त्यांचा पहिला कसोटी सामना 14 ते 18 जून दरम्यान भारताविरुद्ध खेळणार आहे. 

चौधरी म्हणाले, ""अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना अनुभव मिळावा म्हणून भारत दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघाचा त्यांच्याशी सराव सामना खेळवणार आहोत. यासाठी "बीसीसीआय' पुढाकार घेणार आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा आत्मविश्‍वास उंचावण्यास आणि खेळाडूंचे तंत्र सुधारण्यास संधी मिळेल.'' 

अफगाणिस्तान संघ सध्या भारतातच असून, कसोटीपूर्वी बांगलादेशाविरुद्ध ते टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अतिफ मशाल म्हणाले, ""भारताबरोबरच्या क्रिकेट संबंधामुळे आमच्या देशातील क्रिकेटची ताकद वाढायला मदत मिळेल. या दोन देशातील क्रिकेट सामन्यांमुळे शांततेचा संदेशही पोचवला जाईल. भारताची मदत आमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे.'' 

Web Title: Teams touring India will play practice games against Afghanistan