कसोटीमध्ये भारतीय संघाचे भवितव्य उज्ज्वल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुणे - 'बोर्डर-गावसकर करंडक क्रिकेट मालिकेमधील भारतीय संघाच्या विजयामुळे कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळेल. भारतीय खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे कसोटीमध्ये संघाचे भवितव्य उज्ज्वल दिसत आहे. अखेरच्या कसोटीत रवींद्र जडेजाच्या उत्कृष्ट खेळीमुळे सामन्याचे पारडे फिरले,'' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

थेरगाव येथील "पीसीएमसीज' व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे आले असता त्यांनी "सकाळ'शी बोलताना वरील भावना व्यक्त केल्या. क्रिकेट प्रशिक्षक राजू कोतवाल, विजय पाटील, शादाब शेख आदी या वेळी उपस्थित होते.

वेंगसरकर म्हणाले, 'फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी धरमशाला येथील खेळपट्टी सर्वोत्तम ठरली. धरमशाला कसोटीतील प्रत्येक सत्रात उत्कंठा वाढत होती. रवींद्र जाडेजा याने चांगली खेळी केली नसती, तर सामना कोणत्याही दिशेला गेला असता. परंतु, जडेजा याने चांगली खेळी करत सामन्याचे पारडे भारताकडे झुकविले. कसोटीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघच अव्वल असल्याचे दिसून आले. विराट कोहली याच्या अनुपस्थितीत कोणताही कर्णधाराने सहा फलंदाज घेऊन सामन्यात उतरण्यास पसंती दिली असती. परंतु, अजिंक्‍य रहाणे याने पाच गोलंदाज खेळविले. ही मोठी जोखीम होती. मात्र सर्व खेळाडू चांगले खेळले. रवींद्र जडेजा, आर. अश्‍विन, उमेश यादव यांची गोलंदाजीही जमेची बाजू ठरली.''

"स्लेजिंग' रोखणे कर्णधाराच्या हातात !
प्रत्येक खेळाडूला स्वतःचे बलस्थान माहित असते. विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. खेळात शेरेबाजी (स्लेजिंग) होतच असते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शेरेबाजी करण्यास प्रथम सुरवात केली. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी शेरेबाजी करणे सुरू केले. परंतु शेरेबाजी रोखणे कर्णधाराच्या हातात असते. ती मर्यादेबाहेर जाणे योग्य नाही.'

Web Title: Test match bright future in India