भारताविरुद्ध इंग्लंडने धरली फिरकीची कास

वृत्तसंस्था
Friday, 27 July 2018

भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल. 

लंडन - भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल. 

एरवी इंग्लंड संघाचा मायदेशात खेळताना वेगवान गोलंदाजांवर भर असतो, पण या वेळी अदिल रशिद या लेगस्पिनरला दोन वर्षांनंतर पुनरागमन करण्याची संधी दिली. दोन वर्षांपूर्वीच्या भारत दौऱ्यात सपाटून मार खाल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. रशिदसह ऑफस्पिनर मोईनचीही निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेल मालिकेनंतर त्यालाही वगळण्यात आले होते, परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात भरीव कामगिरी केल्यामुळे मोईनचा समावेश करण्यात आला. 

दोन फिरकी गोलंदाजांची निवड करताना इंग्लंडने इसेक्‍सचा वेगवान गोलंदाज जेमी पोर्टरला पदार्पणाची संधी देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. भारत "अ' संघाविरुद्ध काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात इंग्लंड लायन्स संघातून जेमी पोर्टर खेळला होता. 

संघ ः ज्यो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनी बेअरस्टॉ (यष्टिरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, अलिस्टर कूक, सॅम कुरन, केटॉन जेमिंग्स, डेव्हिड मलान, जेमी पोर्टर, अदिल रशिद, बेन स्टोक्‍स. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in test series England depends on spin